बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने दरवर्षी आयोजिण्यात येणारा ‘अन्नोत्सव’ यंदा ६ जानेवारीपासून सुरु होत आहे. बेळगाव आणि परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दरवर्षी रोटरीतर्फे हि पर्वणी मिळते. गेल्या २ वर्षात कोविडमुळे रखडलेला अन्नोत्सव यंदा ६ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत अन्नोत्सव आयोजित करण्यात आला आहे. खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाच्या अन्नोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
सावगाव रोड, नानावाडी येथील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या प्रांगणात यंदा ‘अन्नोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या अन्नोत्सवास अरिहंत हॉस्पिटल यांचे शीर्षक प्रायोजकत्व तर इंडस अल्टम आणि केमको यांचे सिल्व्हर प्रायोजकत्व लाभले आहे. तर नितीन शिरगुरकर आणि गदायुद्ध चित्रपटाने हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे.
प्रत्येक भागाच्या खाद्यसंस्कृतीची विशेष अशी एक खासियत असते. विविध भागातील खाद्यपदार्थांची चव एकाच छताखाली बेळगावकरांना चाखता यावी यासाठी अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बेळगावमध्ये विविध संस्कृतीचे लोक राहात असल्याने येथील खाद्यसंस्कृतीमध्येही विविधता आहे. अन्नोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रांतातील खाद्यपदार्थांची रेलचेल उपलब्ध करून बेळगावकरांना हि पर्वणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश अन्नोत्सव आयोजिण्यामागचा आहे.
यंदा २०० विविध स्टॉल्स अन्नोत्सवात उभारण्यात येणार असून या स्टॉल्सवर दररोज विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी मिळणार आहे. केवळ खाद्यपदार्थांचीच रेलचेल अन्नोत्सवात नसून संस्कृती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सुपरवुम, मिसेस बेळगाव, मास्टरशेफ, सेलिब्रिटी सिंगर्स, सूफी नाईट, बॉलीवूड नाईट, फ्यूजन म्युझिक, फॅशन शो – शोस्टॉपर, बूगी वूगी यासारखे अनेक स्पर्धा कार्यक्रम अन्नोत्सवादरम्यान आयोजिण्यात आले आहेत.
दरवर्षी अन्नोत्सवाला मिळणारा भरघोस पाठिंबा, आणि यादरम्यान नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन यंदा अन्नोत्सवाच्या ठिकाणी पार्किंगसाठी भव्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतकेच नाही तर रेल्वे स्थानक ते अन्नोत्सवाच्या ठिकाणापर्यंत मोफत बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी रिक्षा स्टॅन्डची देखील सोय करण्यात आली आहे. महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
अन्नोत्सवाच्या माध्यमातून आलेला निधी अनेक समाजाभिमुख उपक्रमांसाठी देणगीदाखल देण्यात आला आहे. यानुसार यंदाही हा निधी बेळगाव शहराच्या विविध विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. अन्नोत्सवाची रूपरेषा आर्किटेक्ट बकुल जोशी, मुकुंद बंग, जयदीप सिद्दनवार, नितीन फुजर, संदीप नाईक, दीपेन शहा, मनोज पै. शरद पै. तुषार कुलकर्णी आणि अल्पेश जैन यांनी डिझाईन केली आहे.