अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये राहुल के. आर. शेट्टी (रायगड) आणि साईराज वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय संपादन केला.
शहरातील सरदार्स मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने प्रतिस्पर्धी शिवराज स्पोर्ट्स संघाला 43 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरिअर संघाने मर्यादित 10 षटकात अवघा 1 गडी गमावून 165 धावांचा डोंगर उभा केला. त्यांच्या रुपेश गावकर व जॉनी फर्नांडिस यांनी शैलीदार तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन केले.
गावकर याने अर्धशतकासह नाबाद 86 धावा तर फर्नांडीस याने नाबाद 50 धावा झळकवताना दुसऱ्या गडासाठी 43 चेंडूत 131 धावांची भागीदारी केली. या दोघांना चंद्रकांत जाधव (20 धावा) याने चांगली साथ दिली. प्रत्युत्तरा दाखल शिवराज स्पोर्ट्स संघाला मर्यादित 10 षटकात सहा गडी बाद 122 धावा काढता आल्या या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी रुपेश गावकर (साईराज वॉरिअर्स) हा ठरला.
दुसऱ्या सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने प्रतिस्पर्धी श्री स्पोर्ट्स खडक गल्ली संघाला 76 धावांनी पराभूत केले. नाशिक व मुंबई येथील स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या सरकार स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 10 षटकात 9 गडी बाद 128 धावा काढल्या. त्यांच्या अक्षय पवार (52 धावा), किरण (33 धावा) व बापू खडताळे (17 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. सरकार स्पोर्ट्स संघाच्या भेदक गोलंदाजी व उत्तम क्षेत्ररक्षणामुळे प्रत्युत्तरादाखल श्री स्पोर्ट्स संघाला मर्यादित 10 षटकात 6 बाद 52 धावाच काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी अक्षय पवार (सरकार स्पोर्ट्स गांधीनगर) हा ठरला.
तिसऱ्या सामन्यात रायगडच्या राहुल के. आर. शेट्टी संघाने प्रतिस्पर्धी बेळगावच्या अल -रझा संघावर 40 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना राहुल के. आर. शेट्टी संघाने मर्यादित 10 षटकात 3 बाद 130 धावा झळकविल्या. त्यांच्या ऋतिक पाटील (44 धावा), अजित मोहिते (40 धावा) प्रथमेश बेलचद (नाबाद 20 धावा) व किरण पवार (नाबाद 13 धावा) यांनी उत्तम फलंदाजी केली.
या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ऋतिक पाटील (शेट्टी संघ) हा ठरला. स्पर्धेच्या आजच्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात बलवान सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाला प्रतिस्पर्धी बेळगावच्या साईराज वॉरियर्स संघाकडून 71 धावांनी धक्कादायक पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर्स संघाने 8 षटकात 5 गडी बाद 114 धावा काढल्या.
त्यांच्या अमोल नलवडे (43 धावा), राकेश के. (32 धावा) व रुपेश गावकर (21 धावा) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. प्रत्युत्तर दाखल सरकार स्पोर्ट्स संघ अवघ्या 6 षटकात सर्वगडी बाद 43 धावा असा गारद झाला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी राकेश कहार (साईराज वॉरियर्स) हा ठरला.