अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यांमध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव, अयोध्या कडोली आणि फौजी इलेव्हन या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
शहरातील सरदार्स मैदानावर सदर स्पर्धा क्रिकेट प्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू असून आज सकाळी पहिल्या सामन्यात मुन्नाभाई हा संघ वेळेत मैदानावर दाखल न झाल्यामुळे फॅन्को क्रिकेट क्लबला विजयी घोषित करून पुढे चाल देण्यात आली.
दुसऱ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी शिव इलेव्हन खानापूर संघावर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शिव इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 6 गडी बाद 82 धावा काढल्या. हे आव्हान मराठा स्पोर्ट्स संघाने 7.3 षटकात पूर्ण करताना 5 गडी बाद 86 धावा झळकाविल्या.
तिसऱ्या सामन्यात अयोध्या कडोली संघाने प्रतिस्पर्धी हुक्केरी इलेव्हन संघावर 20 चेंडू आणि 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना हक्केरी इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 8 गडी बाद 86 धावा काढल्या प्रत्युत्तरादाखल अयोध्या कडोली संघाने 6.4 षटकात 2 गडी बाद 89 धावा काढून सामना खिशात टाकला.
आजच्या शेवटच्या चौथ्या सामन्यात सरदार वॉरियर्स संघाला प्रतिस्पर्धी फौजी इलेव्हन संघाकडून 56 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना फौजी इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 7 गडी बाद 105 धावा झळकविला. हे आव्हान सरदार वॉरियर्स संघाला पेलवले नाही आणि त्यांचा डाव 8.5 षटकात सर्व गडी बाद 49 धावा असा संपुष्टात आला.
आता उद्या बुधवार दि. 11 जानेवारी रोजी पुढील प्रमाणे सामने होणार आहेत. 1) जी जी. बॉईज विरुद्ध आर्मी इलेव्हन (सकाळी 9 वा.), 2) एवायएम (ए) वि. एसएसएस फाउंडेशन कणबर्गी (सकाळी 11 वा.), 3) इंडियन बॉईज बेळगाव वि. पहिल्या सामन्यातील विजेता संघ (दुपारी 12:45 वा.) 4) मराठा स्पोर्ट्स विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ (दुपारी 2:30 वा.).