बेळगाव दि 280,:एकीकडे काँग्रेस व निधर्मी जनता दल हे घराणेशाही चालवणारे पक्ष आहेत. ज्यांच्या युतीच्या सरकारने सत्तेवर असताना काँग्रेस हुकुमशहांसाठी कर्नाटकचा एटीएम प्रमाणे वापर केला तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रभक्तांचा भारतीय जनता पक्ष भारताला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्नाटकचा विकास, भारताचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षात करू शकतो. तेंव्हा येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला बहुमताने निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प यात्रेसाठी आज शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आले असता एम. के. हुबळी येथील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ही विजय संकल्प यात्रा म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ आहे. आता कर्नाटकातील जनतेने येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये आगामी 5 वर्षासाठी कर्नाटकामध्ये कोणाची सत्ता असावी हे निश्चित करायचे आहे. एकीकडे काँग्रेस व निधर्मी जनता दल हे घराणेशाही चालवणारे पक्ष आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी प्रयत्नशील असलेला राष्ट्रभक्तांचा भारतीय जनता पक्ष कर्नाटकच्या जनतेने आगामी 5 वर्षे राज्यात कोणते सरकार असावे हे ठरवायचे आहे. एकीकडे 25 -30 जागा जिंकून काँग्रेसच्या कुबड्या घेऊन कर्नाटकात एका घराण्याचे सरकार लादणारे निधर्मी जनता दलाचे ज्यांनी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करून दिल्लीतील काँग्रेस हुकुमशहांसाठी एटीएमचे काम करून कर्नाटकला भ्रष्टाचारात बुडविले.
आज हे पक्ष विविध आश्वासने देत आहेत. मात्र मी एकच सांगू इच्छितो कर्नाटकचा विकास भारताचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षात करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. आज जवळपास 3 कोटी लोकांना घरं आणि वीज तर 10 कोटी लोकांसाठी घरात शौचालय उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे. तसेच 13 कोटी लोकांना घरगुती गॅस शेगड्या उपलब्ध करून दिल्या. याखेरीज 60 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपये पर्यंतचा वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकारकडून देऊ केला. कोरोना नंतर अडीच वर्षे प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 किलो धान्य मोफत देण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले आहे, असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.
देशात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्याने रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुरूम यासारख्या गरीब दलित आदिवासी समाजातील व्यक्तींना सर्वोच्च राष्ट्रपती पद देऊन सन्मानित केले आहे असे सांगून गोव्यातील सरकारशी समन्वय राखून म्हादाई पाणी तंटा मिटविल्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप नेत्यांचे अभिनंदन केले. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याची समस्या म्हादाई प्रश्न सोडवून मिटविली. सोनिया गांधींनी 2007 साली म्हादाईचे पाणी कर्नाटकला देणार नसल्याचे म्हंटले होते
2022 सालच्या गोवा निवडणुकीत काँग्रेसने घोषणपत्रात म्हादाईचे पाणी देणार नसल्याचे घोषित केले होते. मात्र आम्ही गोवा भाजप सरकारला विश्वासात घेऊन उत्तर कर्नाटकला पाणी दिले आणि
जुना वाद मिटवला. काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यांनी उत्तर कर्नाटकासाठी काय केले? असा सवाल मंत्री शाह यांनी केला. याउलट कर्नाटकातील भाजप सरकारने बेळगाव -धारवाड नियोजित 71 कि. मी. अंतराचा रेल्वे मार्ग, कित्तुर येथील मेघा औद्योगिक टाऊनशिप, बैलहोंगल येथील संगोळ्ळी रायण्णा सैनिक स्कूल आदी उत्तर कर्नाटकातील विकास कामांची माहिती दिली. भारतीय जनता पक्षाने देशाला सुरक्षित करण्याचे कार्य केले आहे. ज्यांना तब्बल 70 वर्षे काश्मीरमधील कलम 370 हटवता आले नाही. ते कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जेंव्हा हटविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काँग्रेस व निधर्मी जनता दलाने 370 कलम हटविल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे सांगत मोठा गाजावाजा केला होता. मात्र 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही रक्तपात न होता हटवून काश्मीरला कायमचे भारताशी जोडले असे सांगून बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 16 जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे तेंव्हा येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून द्या असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले तसेच भारत माता की जय, वंदे मातरम ही घोषणा देऊन त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले, राज्य भाजपा अध्यक्ष नलीनकुमार कटील, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आदींसह बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेतेमंडळी उपस्थित होती.