केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हादाई पाण्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर गोव्यात सर्वच स्तरातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. गोव्यातील भाजपचे राजकीय विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, “आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून म्हादई प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. गोव्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आम्ही लढत राहू. कर्नाटकच्या डीपीआरलाही आवश्यक पर्यावरण परवानग्या मिळालेल्या नाहीत. माझे सरकार गोव्याच्या हिताचे रक्षण करेल, अशी ग्वाही मी गोव्यातील जनतेला देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
*अमित शहांच्या त्या विधानावरून, गोव्याचे मुख्यमंत्री अडचणीत*
पणजी – केंद्रीय मंत्री अमित शहा शहा यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील एम.के.हुबळी येथे भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभेत म्हादाई पाण्यावरून केलेल्या विधानानंतर, गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अडचणीत आले आहेत. अमित शहा यांनी म्हादाई पाण्या संदर्भात बोलताना म्हादाईचे पाणी तहानलेल्या कर्नाटक साठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले.या वक्तव्यावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टिका केली असून या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. ते म्हणाले, “भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मी जे सांगत आलो ते सत्य उघडकीस आणले आहे.”
“म्हादई कर्नाटकात वळवणे हा गोव्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा संयुक्त निर्णय होता. आपल्या खुर्चीच्या बदल्यात, त्यांनी गोवावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने पायउतार व्हावे व राजीनामा द्यावा”, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.