बेळगावची युवा होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने केरळ येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स या क्रीडा महोत्सवातील वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
मागील वर्षी विजेतेपदाची हॅट्रिक साधणाऱ्या अक्षताने यंदा सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकाचा मान मिळविला आहे.
केरळ येथे सलग तीन दिवस आयोजित खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स मधील महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धा आज रविवारी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेच्या 87 किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता कामतीने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात प्रथम क्रमांकासह सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले.
स्नॅच अँड क्लीन जर्क या प्रकारात हातखंडा असलेल्या अक्षता कामती हिचे राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले हे नववे पदक आहे. मागील वर्षी बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील दुसऱ्या खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स -2021 मध्ये अक्षता कामती हिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याची हॅटट्रिक साधली होती.
बेळगाव तालुक्यातील हालगा गावची सुकन्या असलेली अक्षता कामती ही गेल्या 2017 सालापासून राष्ट्रीय स्तरावरील महिलांची कनिष्ठ व वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धा तसेच खेलो इंडिया मधील वेटलिफ्टिंग स्पर्धा गाजवत आहे. वर्षभरापूर्वी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे साई नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात अक्षता हिला उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘संस्थात्मक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
अक्षताचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हालगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरियाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती भटिंडा (पंजाब) येथील गुरु काशी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. अक्षताला तिची आई, वडील बसवंत आणि भाऊ आकाश कामती यांचे प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक वीरूपाल व जिल्हा वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. केरळ येथील यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.