हत्तरगी येथे राष्ट्रीय महामार्गावर बसने पेट घेतल्याची दुर्घटना काल घडल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सुवर्ण विधान सौधनजीक राष्ट्रीय महामार्गावर तशीच घडू पाहणारी घटना बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
साताऱ्याहून बेळगावकडे येणाऱ्या धावत्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसला अचानक आग लागण्याची घटना काल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर हत्तरगी टोल नाक्यानजीक घडली. सदर दुर्घटनेत बस जळून खाक झाली असली तरी सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अशीच दुर्घटना आज शुक्रवारी सकाळी होता होता टळली. परिवहन मंडळाची एक बस आज सकाळी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना सुवर्ण विधान सौधच्या पुढे कोपीकोप्प क्रॉसनजीक बसच्या समोरील इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात येताच बस चालकाने तात्काळ बस रस्त्याकडेला घेऊन थांबवली.
तसेच इंजिनमध्ये लागू पाहणारी आग विझवून चालकाने घडल्या प्रकाराची माहिती बेळगाव बस आगार व्यवस्थापकांना दिली. त्यानंतर नादुरुस्त बसमधील प्रवाशांना दुसरी बस मागवून त्यातून मार्गस्थ करण्यात आले.
दरम्यान, या पद्धतीने कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसना आगी लागण्याचे सत्र सुरू झाल्यामुळे प्रवासात हा एक चर्चेचा विषय झाला आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडे असलेल्या बहुतांश बसेस या जुन्या झाल्या आहेत. सदर बसच्या जागी नव्या बस गाड्या आणण्याची प्रयत्न सुरू आहेत. मात्र तूर्तास जुन्या बस गाड्यांद्वारेच प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र आता या जुन्या बस गाड्या आपला प्रताप दाखवू लागल्या आहेत. याआधी या बसेस नादुरुस्त होऊन बंद पडत होत्या, आता त्या इतक्या खराब झाल्या आहेत की त्यांनी पेट घेण्यास सुरू केली आहे
सदर प्रकार हा प्रवाशांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन नव्या किंवा चांगल्या सुस्थितीतील बस गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.