बेळगाव लाईव्ह : श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश यासह देशभरातील विविध भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येतात.
सौंदत्ती येथे पार पडणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त दाखल होणारे भाविक सौंदत्ती येथील पडली कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा गावच्या वेशीवर पडली कार्यक्रमाचे आयोजन करतात. ग्रामीण भागात या यात्रेला ‘मारग’ किंवा ‘मार्ग मळणे’ असे म्हणतात. बेळगाव मध्ये मध्यवर्ती बस स्थानकानजीक असणाऱ्या जागेत नवगोबा यात्रा पार पडते, हाही या यात्रेचाच भाग आहे.
यल्लमा यात्रेनंतर गावोगावी वेशीवर पार पडणाऱ्या यात्रेमागे पूर्वजांनी आखून दिलेल्या काही परंपरा आहेत. गावच्या वेशीवर भरवण्यात येणारी यात्रा यामागे विशेष असे कारण आहे. पूर्वी गावोगावचे अनेक भाविक रेणुका देवी यात्रेसाठी सौंदत्ती येथे जात असत.
मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांमुळे सौंदत्ती येथे अमाप गर्दी व्हायची. या गर्दीत अनेक साथीचे रोग, व्याधी पसरायच्या. पूर्वी म्हणावी तितकी साधणे उपलब्ध नसल्याने हि रोगराई पसरण्याची भीती असायची. शिवाय दळणवळणाची सोयही नसल्याने बहुतांशी भाविक हे पायी किंवा बैलगाडीने जायचे.
यात्राकाळात ८-१० दिवस मुक्काम ठोकणाऱ्या भाविकांमध्ये वातावरणासहित इतर कारणामुळे अनेक साथीचे आजार व्हायचे. हेच आजार यात्रेहून परतल्यानंतर गावातील इतर नागरिकांमध्ये पसरू नयेत, संसर्ग वाढू नये यासाठी यात्रेहून परतलेले भाविक गावच्या वेशीवर थांबायचे. वेशीवर येऊन ३-४ दिवस मुक्काम करायचे. या काळात अनेक धार्मिक विधी पार पाडल्या जायच्या.
मार्ग मळणे नवगोबाची यात्रा संपन्न
वडगांव मंगाई मंदिर परिसर, येळळूर,किल्ला शिवाजी नगर परिसरात यात्रा संपन्न pic.twitter.com/EW0CzpbNMs— Belgaumlive (@belgaumlive) January 10, 2023
अशा गोष्टींच्या माध्यमातून पुन्हा भाविकांचा मेळा भरायचा. याच दरम्यान पुन्हा एकदा पडली पूजनाचा कार्यक्रमही केला जायचा. ही प्रथा गेला कित्येक वर्षांपासून अशीच चालत आली आहे. आज देखील ही परंपरा अत्यंत भक्ती पूर्व आणि भावनिक दृष्टिकोनातून पार पाडली जाते.
गेल्या ७-८ दिवसांपूर्वी गेलेले गावोगावचे अनेक भाविक आज बेळगावमध्ये परतले असून शिवाजी नगर किल्ला येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेत नावगोबाची यात्रा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. याचप्रमाणे बेळगाव शहरातील उपनगर असलेल्या वडगांव मध्ये मंगाई मंदिर परिसर, कलमेश्वर मंदिर परिसर जुने बेळगाव आणि तालुक्यातील येळळूर सह अनेक गावांमध्ये वेशीवरच ‘पडली पूजना’चा कार्यक्रमही पार पडला.
'पडल्या भरण्याचा' झाला कार्यक्रम
श्री रेणुका देवी यल्लममा यात्रा आटोपून आल्यावर दरवर्षी प्रमाणे येळळूर इथे हा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी हजारो महिलांनी या सहभाग दर्शवला होता. pic.twitter.com/7tI8r5uKBz— Belgaumlive (@belgaumlive) January 10, 2023