आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसने आपले पहिले निवडणूक आश्वासन दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 200 युनिट वीज मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.
चिक्कोडी येथे प्रजाध्वनी यात्रा बैठकीप्रसंगी आज बुधवारी ते बोलत होते. बेरोजगारी आणि मूलभूत गरजांचे वाढते दर लक्षात घेता कर्नाटकाला जनतेची काळजी घेणाऱ्या सरकारची आवश्यकता आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (आयएनसी) कर्नाटकातील सरकार कन्नडीगांना वाढत्या महागाईच्या विरोधात लढण्यास बळ देण्यासाठी प्रत्येक घराला 200 युनिट मोफत वीज पुरवठा करेल असे स्पष्ट करून डी. के. शिवकुमार यांनी कोरोना प्रादुर्भाव काळातील भाजपचे गैरव्यवस्थापन, जीवनावश्यक वस्तूंची दर वाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती आणि वाढती बेरोजगारी यांचा संदर्भ घेऊन राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य काँग्रेस शाखेने काल मंगळवारी ‘प्रजाध्वनी’ या शीर्षकाखालील आपल्या निवडणूक प्रचार यात्रेची घोषणा केली असून ज्याचा शुभारंभ आज बुधवारी 11 जानेवारी रोजी करण्यात आला आहे.
याखेरीज काँग्रेसने ‘पापद पुराण’ (पापांची गाथा) या नावाने भाजप सरकारवरील आरोप पत्र देखील प्रकाशित केले आहे. याव्यतिरिक्त जनसंपर्कासाठी काँग्रेस पक्षाने ‘प्रजाध्वनी डॉट कॉम’ या नावाने वेबसाईट देखील सुरू केली असून पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने नागरिकांना आपल्या अपेक्षा व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसने हैदराबाद आणि कर्नाटक प्रदेशासाठी अनेक आश्वासने दिली .
असून त्यामध्ये 200 युनिट मोफत वीज, 5 कोटी रुपयांच्या तरतुदीचा अर्थसंकल्प, पहिल्या नऊ महिन्यात रोजगाराच्या रिक्त जागा भरणे, प्रलंबित जलसिंचन योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद, तिसऱ्या टप्प्यातील अप्पर कृष्णा उपसा जलसिंचन योजनेची पूर्तता, अनुसूचित जाती राखीवते संदर्भात सदाशिव समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक भुमीहिन कुटुंबाला दोन एकर कोरडवाहू जमीन आदींचा समावेश आहे.