बेळगावच्या सुवर्णसौध इमारत उभारणीसाठी आपली जमीन देऊ केलेल्या हलगा गावाला बऱ्याच वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता ग्रामस्थांनी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.
हलगा (ता. जि. बेळगाव) गावाने बेळगावातील विधानसौध इमारतीच्या उभारणीसाठी आपली जमीन देऊ केली असली तरी प्रशासनाचे मात्र या गावाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. हलगा गावाला गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
या गावाजवळूनच विधान सौधसाठी 24 तास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीचा विधान सौधकरिता आपली जमीन देणाऱ्या हलगा गावाला मात्र लाभ करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील गेल्या अनेक वर्षापासूनची पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांना विशेष करून गृहिणींना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत असते. पाण्याच्या समस्ये संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात आलेले नाही.
त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सध्याच्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांचे हलगा गावच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.