बेळगाव सुवर्ण विधानसौधला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महामार्गा शेजारील मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी शेजारील शेतवाडीत शिरून संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे भात व कडधान्य पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी पुणे -बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील हरिकाका कंपाउंडच्या ठिकाणी उघडकीस आली.
याबाबतची माहिती अशी की, बेळगाव सुवर्ण विधानसौधला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महामार्गा शेजारील मुख्य जलवाहिनी काल रात्री अचानक फुटली. धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुवर्णसौध जवळील सर्व्हिस रोडनजीक जलवाहिनी फुटल्यामुळे हरीकाका कंपाउंडच्या विरुद्ध बाजूस असलेल्या शिवारात पाणी शिरले.
काल रात्रीपासून जलवाहिनीचे हजारो लिटर पाणी शिवारात शिरल्यामुळे अरुण पांडुरंग पुजारी या शेतकऱ्यांसह अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. अरुण पुजारी या शेतकऱ्याने आपल्या सात-आठ एकर जमिनीतील सुमारे 100 पोती भाताची मळणी गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू केली होती.
मोठ्या प्रमाणात पाणी गाद्यांमध्ये शिरल्यामुळे पुजारी यांचे कापणी केलेले तसेच मळणी केलेले भात पूर्णपणे भिजून खराब झाले आहे त्याचप्रमाणे शेतातील कडपाल अर्थात कडधान्य पीकदेखील पाण्याखाली गेल्यामुळे पुजारी यांचे जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुजारी यांच्या व्यतिरिक्त आसपासच्या अन्य शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये देखील फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी शिरून तेथील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात शिरल्याचे आज सकाळी संबंधित शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्यात हाहाकार माजला. तसेच त्यांनी शेतातील गाद्यांमधील पिकात तुंबून राहिलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी धडपड सुरू केल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.
दरम्यान, सदर प्रकाराची माहिती मिळताच आज सकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करून गळती थांबवण्याबरोबरच संबंधित शेतकऱ्यांना त्वरेने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र नुकसान भरपाई मिळाल्याखेरीज जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेऊ दिले जाणार नाही असा पवित्रा घेऊन शेतकरी आक्रमक झाले होते. तेंव्हा जिल्हाधिकारी पाटील यांनी त्यांची समजूत काढताना सर्वेक्षण करून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे ठोस आश्वासन दिले आहे.
मुख्य जलवाहिनी फुटून शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या या घटने संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी मुख्य जलवाहिनी फुटून पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग शेजारील अरुण पुजारी या शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे कशाप्रकारे नुकसान झाले आहे याची माहिती दिली. हजारो लिटर पाणी शिवारात शिरल्यामुळे भात पिकासह जवळपास 50 एकर जमिनीतील कडधान्य पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे सांगून पुजारी या शेतकऱ्याची तर संपूर्ण शेतजमीन पाण्याखाली जाऊन वर्षभर घेतलेली मेहनत वाया जाण्याबरोबरच त्याच्यावर मोठे संकट कोसळल्याचे सांगितले.
सदर दुर्घटनेला शहर पाणीपुरवठा मंडळ पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांच्या कंत्राटदाराने जलवाहिनी व्यवस्थित न घातल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत असे स्पष्ट करून फुटलेल्या जलवाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण शिवार नष्ट होण्याचा धोका असल्याचे नारायण सावंत यांनी सांगितले.