2022 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2023 या नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण विशेष करून तरुणाई सज्ज होत असताना थर्टी फर्स्टला अधिक दुर्घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर चालक व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून संपूर्ण जिल्ह्याभरात एकूण 56 रुग्णवाहिका 24 तास अलर्ट अर्थात सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. दरवर्षी या काळात अपघातांच्या घटनांची अधिक नोंद होत असल्यामुळे शहरासह जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवा अलर्ट असणार आहे. बेळगाव शहरासाठी 7 रुग्णवाहिका तर जिल्ह्यासाठी 46 रुग्णवाहिका 24 तास सेवा देण्यासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून पोलीस अधिकारी दखील रात्री उशिरापर्यंत शहरात गस्तीवर राहणार आहेत. हायवे पेट्रोलिंगसह पोलिसांची विशेष पथकेही गस्त घालणार असून महिला व तरुणींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी चन्नमा पथक देखील कार्यरत राहणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे नववर्षाचे स्वागत करण्यावर सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे तरुणाईने अत्यंत साधेपणाने थर्टी फर्स्ट साजरा केला होता. मात्र यंदा सर्व नियम शिथील करण्यात आले असल्याने थर्टी फर्स्ट व नववर्षाची उत्साहाने जल्लोषी स्वागत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फेस मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. सुवर्णशोध परिसरात बूस्टर डोस दिला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टी फर्स्टच्या रात्री जिल्ह्यात रुग्णवाहिका तैनात असतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रमेश कोणी यांनी दिली आहे.