शिक्षण खात्याने गेल्या सोमवारी दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केल्यानंतर मार्च -एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 33 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेला येत्या 31 मार्च 2023 पासून प्रारंभ होणार असून 15 एप्रिलला परीक्षेचा अंतिम पेपर होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील फ्रेश व रिपीटर्स विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अधिक प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव शहर, रामदुर्ग समृद्धी तालुक्यामध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या उलट खानापूर व कित्तूर येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. यावेळी शिक्षण खात्याने 15 दिवस अगोदर शैक्षणिक वर्षाला सुरुवात केल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने अनेक शाळांनी दररोज एक तास अधिक वेळ घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याकरता दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्याचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
विद्यार्थ्यांनी आतापासूनच परीक्षेची तयारी सुरू करावी. यावेळी निकाल चांगला लागावा यासाठी सर्व शाळांना सूचना केली आहे, असे शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी सांगितले.