बहुजन समाजातील प्रेरक श्रमदाते *कै. एम डी चौगुले प्रतिष्ठान मण्णूर तालुका बेळगाव* यांच्या विद्यमाने गेली सात वर्षे चालू असलेली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रित व्याख्यान मालेला येथील मण्णूर हायस्कूल मण्णूरच्या सभागृहात मराठी विषयाच्या सी वाय पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्ही पासून अलिप्त राहून येत्या दोन तीन महिन्यांत आपलं ध्येय केंद्रीत करावं अशा शुभेच्या बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वकील सुधीर चव्हाण व तालुका मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव आतवाडकर यांनी दिल्या.
प्रारंभी अध्यक्ष पी के नाईक, शिवाजीराव आतवाडकर, अॅड. सुधीर चव्हाण, आंबेवाडी ग्राम पंचायत चेअरमन चेतन पाटील, नारायण कालकुंद्री, शिवाजी कालकुंद्री, भरत चौगुले, महेश काकतीकर, मल्लाप्पा चौगुले, देवाप्पा पाटील, सौ प्रीती एम चौगुले, गोजगा हायस्कूलचे मुख्याध्यापक पी आर जाधव यांचे स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभियंता आर एम चौगुले यांनी सहभागी शाळांच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत व्याख्यानमालेचा उद्देश विशद केला व व्याख्यान मालेत सहाही दिवस हजर राहून उत्तम गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी भरघोस रोख पारितोषिकांची घोषणा केली व या संधीचा फायदा परिसरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते प्राध्यापक अरविंद पाटील यांनी आपल्या भाषणातून अनेक संदर्भातून अभ्यासाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी घ्यावयाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत आपल्या ओघवत्या भाषणाचा विनोदी शैलीत समारोप केला. या कार्यक्रमाला मण्णूर परिसरातील जवळ जवळ तेरा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी हजर होते.
सदर व्याख्यानमाला पुढील पाच रविवार चालणार असून या व्याख्यानमालेत दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करण्यासाठी उपयुक्त गोष्टीवर भर दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार निवृत्त शिक्षक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.