बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे शुक्रवारी दुपारी तहकूब झालेले हिवाळी अधिवेशन आता थेट येत्या सोमवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यामुळे लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ थांबून शहरातील वाहतूक पुन्हा सर्वसामान्य झाली आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन काल शुक्रवारी दुपारी तहकूब करण्यात आल्यानंतर बेळगाव शहरातील लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ कमी झाली होती. आज शनिवारी तर ही वर्दळ अत्यल्प होती. कारण अधिवेशन तहकूब होताच काल शुक्रवारी दुपारी बहुतांश मंत्री व आमदार आपापल्या मतदारसंघात किंवा सहलीसाठी रवाना झाले आहेत.
हे सर्व मंत्री -आमदार रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी अधिवेशनासाठी पुन्हा बेळगावात दाखल होणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा चार दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत शहरात केए 01 किंवा कर्नाटकातील अन्य पासिंगच्या लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ वाढणार आहे.
एकंदरच आज शनिवार आणि उद्या रविवारी लालबत्तीच्या गाड्या आणि त्यांच्या मागे -पुढे असणारा पोलीस व शासकीय वाहनांचा ताफा यांची वर्दळ नसल्यामुळे शहरातील वाहन चालकांना दिलासा मिळाला. गेले पाच दिवस मंत्री व अती महनीय व्यक्तींच्या लाल दिव्याच्या गाड्यांचा सातत्याने वावर असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अडविण्यात येत होती.
कोणतीही पूर्वसूचना न देता रहदारी पोलिसांकडून रस्ता अचानक अडविण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आज हा प्रकार अनुभवावयास न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये विशेष करून वाहनचालकांमध्ये दिलासा व्यक्त होत होता. गेले पाच दिवस शहरातील प्रमुख रस्त्यांवर मंत्री आमदार आणि अति माननीय व्यक्तींच्या वाहनांची सतत वर्दळ होती मात्र आज शनिवारपासून ती वर्दळ थंडावल्याचे जाणवत होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे नियमन करणारे पोलीसही रिलॅक्स झाले होते.
गेल्या सोमवारपासून काल शुक्रवारपर्यंत पाच दिवस धावपळीची गेल्यामुळे अधिवेशनासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी आज सुट्टी घेतली होती. परगावहून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी काहीजण आपापल्या गावाला गेले तर उर्वरितांनी आपल्या लॉज व हॉटेल्समध्ये विश्रांती घेणे पसंद केले होते. त्याचप्रमाणे यापैकी बऱ्याच जणांनी आज सायंकाळी आणि उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी खरेदी, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे वगैरे सुट्टीचा बेत देखील आखला आहे.
त्यामुळे परगावच्या लोकप्रतिनिधींसह मंडळी शहरात खरेदी वगैरे करण्याबरोबरच कोल्हापूर अंबाबाई देवस्थान, गोवा वगैरे ठिकाणी भेटी देऊन येत्या सोमवारी सकाळी पुन्हा आपल्या अधिवेशनाच्या कामात व्यस्त होणार आहेत. एकंदर गेल्या पाच दिवसाच्या तुलनेत अधिवेशन तर तहकूब झाल्यानंतर आज शनिवारचा दिवस मंत्र्यांची व शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची वर्दळ नसल्यामुळे शहरवासीयांसाठी सर्वसामान्य होता. मात्र येत्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पुन्हा शहरातील रस्त्यांवर लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ वाढणार आहे.