बेळगावचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना संघाचा सलामीचा फलंदाज सिद्धेश असलकर याने सध्या सुरू असलेला अरुणाचल प्रदेश क्रिकेट संघटने विरुद्धचा विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा सामना गाजवताना आज शानदार नाबाद द्विशतक झळकविले आहे.
सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि अरुणाचल प्रदेश क्रिकेट संघटना (एआरसीए) प्रतिष्ठेच्या विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा सामना सुरू आहे. या सामन्यात बेळगावच्या सिद्धेश असलकर याने सलामीला फलंदाजीस जात नाबाद 202 धावांसह शानदार द्विशतक झळकविले आहे.
हे द्विशतक त्याने 266 चेंडूत झळकाविले असून त्यामध्ये 24 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अनंथ एस. याच्या साथीने केएससीए संघाला 79 धावांची सलामी देणाऱ्या सिद्धेश याने कर्णधार आदर्श डी. उर्स (107 धावा) याच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी 275 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. सिद्धेश असलकर यांच्या तडाखेबंद शानदार फलंदाजीमुळे केएससीए संघाला 88 षटकांमध्ये 2 गडी बाद 361 धावा अशी मजबूत धावसंख्या उभारता आली.
फलंदाजी बरोबरच सिद्धेश असलकर याने गोलंदाजीमध्ये देखील आपली कमाल दाखविली. त्याने पहिल्या डावात 10.5 षटकात 51 चेंडू निर्धाव टाकताना 26 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावात 3 षटकात म्हणजे 18 चेंडूंपैकी 17 चेंडू निर्धार टाकताना अवघी 1 धाव देऊन एआरसीए संघाचे 2 गडी गारद केले.
प्रतिष्ठेच्या विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेतील सिद्धेश असलकर यांच्या या चमकदार कामगिरीबद्दल केएससीए संघातील खेळाडूंनी त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला असून बेळगाव शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये देखील सिद्धेशची मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.