बेळगावच्या मातब्बर महिला जलतरणपटू आणि बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कर्मचारी ज्योती कोरी -होसट्टी यांची येत्या जानेवारी 2023 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील नागरी सेवा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या चमुत निवड झाली आहे.
बेंगलोर येथे गेल्या मे महिन्यामध्ये झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेमध्ये बेळगावच्या ज्योती कोरी होसट्टी यांनी चमकदार कामगिरी नोंदविले होती कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी असणाऱ्या ज्योती कोरी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील महिलांच्या 200 मी. फ्रीस्टाईल आणि 100 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये सुवर्णपदक तर 100 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत रौप्य पदक पटकावले होते.
या कामगिरीमुळे त्यांची नवी दिल्ली येथील डॉ शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्याची ज्योती कोरी -होसट्टी यांची ही सलग चौथी वेळ आहे हे विशेष होय.
अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेसाठी ज्योती यांच्यासह दहा जलतरणपटूंचा महिला संघ लवकरच नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. ज्योती कोरी -होसट्टी यांनी अल्पावधीत मातब्बर महिला जलतरणपटूचा दर्जा प्राप्त केला असून यापूर्वी अनेकदा त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुयश मिळविले आहे.
शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात होण्याचा सराव करणाऱ्या ज्योती यांना जलतरण प्रशिक्षक गोवर्धन काकतकर, नितेश कुडुचकर आणि उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील निवडीबद्दल ज्योती कोरी -होसट्टी यांचे आरोग्य खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.