शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली असून शाळांना किती शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत याचा तपशील येत्या 14 जानेवारी 2023 पर्यंत द्यावा लागणार आहे.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांना जे विद्यार्थी गैरहजर राहत आहेत त्या विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थी गैरहजर राहण्याचे कारण शोधणार आहेत. ऊस तोडणी कामगार आणि उत्पादनाच्या कामासाठी कुटुंबासह विविध गावात दाखल झालेल्या कामगारांच्या मुलांची माहितीही संकलित केली जाणार आहे.
तसेच शिवारात वास्तव्य केलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवारांमध्येच तंबू शाळा सुरू करता येते का याची चाचपणी केली जाणार आहे. तसेच शक्य असेल त्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत.
हॉस्पिटल वगैरे बांधकामाची ठिकाणं, हॉटेल्स, चित्रपट गृहे, छोटे कारखाने, रेल्वे स्टेशन, गॅरेज, दुकाने आदी ठिकाणी मुले आढळून आल्यास त्यांची चौकशी करून माहिती घेतली जाणार आहे.
राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे शिक्षण खात्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षण कशा प्रकारे करावे? यासाठी एक दिवसाचे प्रशिक्षणही दिले आहे. आता सर्वेक्षणाला प्रारंभ झाला असून या कामामुळे शिक्षकांवरील कामाचा बोजा मात्र वाढला आहे.