Thursday, December 26, 2024

/

आमच्या हक्काची गावे आम्ही घेणारच : संजय राऊत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी काल कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंजूर केलेल्या ठरावाचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटले असून बोम्मई यांच्या वक्तव्याचा समाचार आज खासदार संजय राऊत यांनी घेतला असून सीमावादात तेल ओतून आग लावण्याचे काम बोम्मई करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कर्नाटकात महाराष्ट्रातील नेतेमंडळींना प्रवेश बंदी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी कर्नाटकात चीनप्रमाणे आपण प्रवेश करू असे विधान केले. यावर बोम्मईंनी काल राऊतांना चीनचे एजंट आणि देशद्रोही म्हटले. यावरून आज संजय राऊत यांनी पुन्हा घणाघाती वार केला असून चीनच्या राष्ट्रपतींना अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर झुले देऊन सन्मान करणाऱ्यांना काय म्हणणार? असा टोला लगावला.

ज्या गोष्टी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर स्पष्ट करण्यात आल्या, त्या गोष्टी बोम्मई मनात नाहीत. आमची संस्कृती आणि संस्कार काढण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे तोंड बंद असल्याने बोम्मईंची जीभ जास्त वळवळत आहे अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारसह भाजपाचाही समाचार घेतला.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाली, गोंधळ झाला, अनावश्यक विषय काढले गेले, व्यक्तिगत टीका-टिप्पण्या झाल्या. मात्र कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्रविरोधी ठराव मंजूर केला याची माहिती येथील सरकारला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातील सरकार दुर्बल असून आजतागायत महाराष्ट्रविरोधात अशा भाषेचा वापर कुणी केला नसल्याचे राऊतांनी सांगितले. कर्नाटकाची जमीन आपल्याला नको मात्र आमची हक्काची गावे आपण मागत आहोत.

आम्ही फायद्याच्या नाही तर कायद्याच्या भाषेत बोलत असल्याचा टोलाहि त्यांनी बोम्मईंना लगावला. शिवाय बोम्मई यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.