बेळगाव लाईव्ह वेब न्युजच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी शिवसेनेचे नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यासह प्रकाश बेळगोजी आणि किरण ठाकूर यांच्या वर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दाव्यासंदर्भात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज गुरुवारी बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने दाव्याची पुढील तारीख 7 फेब्रुवारी 2023 ही दिली आहे.
बेळगाव पोलिसांनी 2018 मध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून शिवसेना नेते व महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य संजय राऊत त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बेळगावच्या चतुर्थ जीएमएफसी न्यायालयाने त्यासंदर्भात समन्स बजावून राऊत यांना आज 1 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
त्यानुसार न्यायालयामध्ये आज राऊत व बेळगोजी यांच्यावतीने वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार व ॲड. मारुती कामान्नाचे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपी) कलमाखाली अर्ज आणि वकालतनामा दाखल केल्यामुळे न्यायालयाने या दाव्याची सुनावणी येत्या 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत पुढे ढकलली आहे.
आज न्यायालयामध्ये संजय राऊत यांच्या वकिलांसमवेत म. ए. समिती नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, प्रकाश राऊत उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम आदींसह बेळगावातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक सुरू असतानाच म्हणजे 30 मार्च 2018 रोजी संजय राऊत यांनी बेळगाव live च्या कार्यक्रमासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्याबद्दल राऊत यांच्या विरोधात टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
या दाव्याची सुनावणी आज 1 डिसेंबर रोजी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात होणार होती. या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स राऊत यांच्यासह बेळगाव live चे प्रकाश बेळगोजी किरण ठाकूर अश्या तिघांना बजावण्यात आले होते. राऊत वगळता अन्य दोघांच्या वतीने ॲड. श्रीधर कुलकर्णी व ॲड. भैरू टक्केकर काम पाहणार आहेत.