राजकारण ते समाजकारण असा प्रवास करणाऱ्या बेळगावच्या माजी महापौर विजय मोरे यांच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या शांताई वृद्धाश्रमाला आज पहाटे पहाटे शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. आजी आजोबांची सेवा करण्याचे तेथील व्रत पाहून रोहित पवार हे भारावून गेले.
आपल्या आजोबांच्या शरद पवार वाढदिवसाच्या निमित्त आश्रमाच्या कार्याला त्यांनी देणगी दिली. पहाटेच्या वेळी साडेपाच सहाच्या दरम्यान रोहित पवार शांताई वृद्धाश्रमात दाखल झाले. रोजच्या नित्यक्रमाप्रमाणे शांताईचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे सकाळच्या न्याहारीची व्यवस्था करत होते.
अचानक आपल्यासमोर महाराष्ट्रातला एक युवा नेता दाखल झाल्याचे पाहून विजय मोरेना विश्वासच बसला नाही. मात्र मी रोहित पवार, शरद पवारांचा नातू खास तुम्हाला भेटायला आलोय….. असे शब्द समोरून आले आणि विजय मोरेही भारावून गेले. संपूर्ण आश्रमाच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी रोहित पवार यांना दिली. रोहित पवार यांनीही अशा पद्धतीचे काम आपण करत आहात याबद्दल आम्हाला आपला अभिमान आहे.
सामाजिकतेच्या क्षेत्रात आपण केलेल्या योगदानाची आम्हास पवार कुटुंबीयांना नक्कीच माहिती आहे. तुमच्याबद्दल आमच्या कुटुंबात आमच्या घरात नेहमीच चर्चा होत असते. यामुळेच खास मी आपल्या भेटीला आलो आहे. असे उद्गार यावेळी त्यांनी काढले. भरीव अशी देणगी दिल्यानंतर शांताई च्या या कार्याची माहिती आपण महाराष्ट्रात पोहोचवणार आहे.
निराधार वृद्धांना विनामूल्य असे सहकार्य आपण करत आहात. या कार्याची दखल देश पातळीवर घेतली गेली पाहिजे. असे उद्गार रोहित पवार यांनी काढले. शांताई आश्रमातील आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जात आहोत.
आपल्याला भरीव असे योगदान द्यायचे आहे. असेही ते शेवटी म्हणाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंजिनिअरिंग सेलचे प्रमुख अमित देसाई, अलन मोरे,आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.