1 जून 1986. कन्नड सक्ती विरोधी आंदोलनाने पेट घेतला होता. त्यावेळी सीमा वासियांना आधार देण्यासाठी गनिमी कावा करून महाराष्ट्रातून बेळगाव येथे दाखल झाले होते ते एकमेव असे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. गनिमी काव्याने त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच बेळगावच्या कित्तूर चन्नम्मा चौकात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या प्रचंड लाटी हल्ल्यात त्यांनीही कर्नाटकी पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या होत्या.
आज त्याच ठिकाणाला भेट देऊन त्यांच्या नातवाने आमदार रोहित दादा पवार यांनी आपल्या आजोबांनी खाल्लेल्या लाठयांची त्यांनी सीमावासीयांसाठी केलेल्या आंदोलनाची अनुभूती घेतली. त्याच चौकात दाखल होऊन रोहित पवार यांनी 36 वर्षांपूर्वी झालेल्या त्या आंदोलनाची धग आजही सीमाभागात टिकून आहे याचा अनुभव घेतला. हे सारे अनुभव आपले आजोबा शरद पवार यांना आपण जाऊन सांगणार आहे.
कारण त्यांनीच माझ्यावर ही जबाबदारी दिली, जा सीमावासियांना भेट आणि त्यांच्या भावना जाणून घे….. महाराष्ट्र सरकारच्या सीमा समन्वयक मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी कर्नाटक सरकारने घातलेला मज्जाव…. त्यांनी रद्द केलेला दौरा…. त्यानंतर कर्नाटकातील परिस्थिती निवळली नाही तर आपण स्वतः जाऊ असा शरद पवारांनी दिलेला अल्टिमेटम आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा दौरा करण्याची गरज नाही अशी केलेली विनवणी…. अशा साऱ्या परिस्थितीत शरद पवारांच्या रक्ताचा त्यांच्या पिढीतील तिसरा शिलेदार रोहित पवार गनिमी काव्याने बेळगाव दाखल झाले…. बेळगावातील एकंदर परिस्थितीची जाणीव करून घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात याची कल्पना देण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हुतात्म्यांना अभिवादन केले समिती नेत्यांची भेट ही घेतली आणि आपल्या आजोबांनी जेथे लाठीकाठी खाल्ली, सीमावासियांसाठी आंदोलनात सहभाग घेतला त्या ठिकाणाला जायला ते विसरले नाहीत. त्याच चौकात दाखल होऊन त्यांनी स्थानिक पत्रकारांसोबत बातचीत केली. आपल्या आजोबांनी केलेला त्याग आणि दिलेली लढाई याची सारी माहिती करून घेतली.
आजोबांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली ती आपण यशस्वीपणे पार पाडली आहे. कर्नाटक सरकारने कितीही विरोध केला तरी कर्नाटकात आणि आपल्या हक्काच्या सीमा भागात येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. असा एक इशाराच रोहित पवार यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी दाखवलेले धाडस सीमावासियांचे बळ वाढविणारेच ठरले आहे. सीमावासियांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे दडपण्याचा प्रकार सुरू आहे.
अशा साऱ्या परिस्थितीत महाराष्ट्र हा एकमेव आधार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल होऊन सीमा वासियांना घातलेली फुंकर हा एकमेव आधार असतो. मात्र कर्नाटकाच्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेऊन एकंदर पद्धतीत सीमा वासियांना निराधार करण्याचाच प्रकार घडला होता, मात्र आज रोहित पवारांनी एकच वादा केला आणि सीमावासिय सुखावले आहेत.