मंत्रिपदाची मागणी करत विधानसभेच्या कामकाजापासून दूर राहिलेले भाजपचे दोन आमदार के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली.
कथित सेक्स स्कँडल मार्च 2021 मध्ये उघडकीस आल्यापासून बेळगावमधील गोकाकचे आमदार जारकिहोळी यांनी विधानसभेच्या कोणत्याही अधिवेशनात क्वचितच हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शिवमोग्गाचे आमदार ईश्वरप्पा यांनीही निषेध म्हणून जोपर्यंत त्यांना मंत्री केले जात नाही तोपर्यंत अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते.
कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी तपास यंत्रणेने आपल्याला क्लीन चिट दिल्याचे ईश्वरप्पा यांनी सांगितले होते. कारण त्यांनी सार्वजनिक कामावर 40 टक्के कमिशन मागितल्याचा ठेकेदाराचा आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नाही.
दोन्ही आमदार अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बोम्मई यांनी आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “आमदार के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी मला भेटले होते आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मी त्यांना दिल्लीत झालेल्या बैठकीचा तपशील समजावून सांगितला आहे,” असे बोम्मई म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विस्ताराची गरज मी पक्षाच्या हायकमांडला आधीच कळवली आहे असे सांगून यावेळी ते अधिक तपशील मागतील आणि त्यासाठी संमती देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कर्नाटकातील 34 मंजूर मंत्रिपदांच्या तुलनेत राज्यात केवळ 28 मंत्री आहेत. निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.