कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भात जी वक्तव्य केली आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना चांगलेच सुनावल्याबद्दल बेळगावचे माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी तात्काळ एका पत्राद्वारे शरद पवार यांचे अभिनंदन केले आहे.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये. मराठी माणसाचा संयम सुटला तर जे काही होईल त्याला सर्वस्वी केंद्र व कर्नाटक सरकार जबाबदार राहील. मराठी भाषिक आणि वाहनांवरील सुरू असलेले हल्ले पुढील 48 तासात थांबवा, अन्यथा मी स्वतः बेळगावात येऊन मराठी बांधवांबरोबर उभा राहीन, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावले आहे.
याबद्दल माजी जि. प. सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांनी शरद पवार यांचे त्रिवार अभिनंदन केले आहे. कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या ट्रक अडवून काचा फोडून धुडगूस घालत असताना महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा आम्हाला प्रश्न पडतो. आमची सीमा भागातील 865 गावे राहिली बाजूला आणि महाराष्ट्रातील नवीन गावांचा जाणीवपूर्वक वाद काढण्यात येतो.
असा निंदनीय प्रकार आपल्या सरकारच्या काळात कधीही उपस्थित झाला नाही. आम्ही सर्व मराठी भाषिक जनता आपले ऋणी आहोत व समस्त मराठी जनता आपल्या सोबत आहे अशी ग्वाही देतो, अशा आशयाचे पत्र मोदगेकर यांनी शरद पवार यांना धाडले आहे.