बेळगावचे जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून अनेक वर्ष पद अडवून ठेवणाऱ्याचे संघटन कौशल्य कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. व्यक्तीकेंद्रित राजकारण करण्यासाठी बेळगावचे जिल्हा प्रमुख प्रसिद्ध आहेत. अनेक वर्ष कार्यकर्त्यांना पदे न वाटणे,कार्यकर्त्यांना कार्यक्रम न देणे, त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांसोबत असलेली नाराजी दूर न करणे, त्यांच्या अशा धोरणामुळे मूळ संघटनेलाच हानी पोहोचली आहे.
शिवसेनेची स्वतःची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. एक वेगळी “स्टाईल” आहे. मात्र बेळगावच्या शिवसेनेचे गणित वेगळेच आहे. येथील पदाधिकाऱ्यांचे समीकरण पदाभोवती फिरत आहे. बेळगावच्या शिवसेनेची धोरणं किंवा काम मूळ शिवसेनेच्या चौकटीत कुठेच बसत नाही.
कार्यकर्त्यांना मुख्य निर्णयात कुठेही सहभागी केलं जात नसल्यामुळे सीमाभागातील शिवसेनेचा दरारा कमी होत चालला आहे. शिवसेनेची बांधणी ही कार्यकर्त्यांच्या संघटनेवर अवलंबून आहे. मात्र बेळगाव मधील शिवसेना जिल्हा प्रमुखच्या वादावरून रेंगाळत चालली आहे. येथील पदाधिकाऱ्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमधील एकोपा नाहीसा होत चालला आहे. केवळ मुंबईच्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांशी संपर्क साधून ‘मी’ म्हणजे बेळगावचे शिवसेना असं व्यक्ति केंद्रित राजकारण असल्याने बेळगावात शिवसेनेची वाताहत झाली आहे.
एकेकाळी बेळगाव महापालिकेत बारा ते पंधरा नगरसेवक निवडून आणणारी शिवसेना सध्या अस्तित्वासाठी झगडत आहे. सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी अनेक वेळा शिवसेनेत पडलेल्या विविध गटांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र यालाही पदाची आस आणि कार्यपद्धत छेद देणारी ठरली. एकेकाळी बेळगावमध्ये असलेला शिवसेनेचा दरारा आता मात्र अस्मिता गहाण टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बेळगाव शिवसेनेची सूत्रं पदाच्या वादाभोवती फिरत असल्याने बेळगावची शिवसेना अस्तित्वहीन बनली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात आहे पण कार्यपध्दती आणि पदभार योग्य नेतृत्वाच्या हाती आला तर बेळगाव शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल यात शंका नाही.
क्रमशः