लंपी स्किन रोगामुळे खबरदारी म्हणून गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यातील बकरी बाजारांवर घालण्यात आलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. बकऱ्यांना या रोगाची लागण होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही बंदी उठवण्यात आली असून त्यामुळे बकरी पालक आणि मटन विक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी स्कीन रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशु संगोपन खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रारंभीच्या काळात हा रोग बकऱ्यांना होऊ शकतो अशी शक्यता तज्ञांनी वर्तवल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व बकरी बाजारांवर बंदी करण्यात आली होती.
तसा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला होता. बकरी बाजार बंद झाल्यामुळे बकरी मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची अर्थात मटण विक्रेत्यांची गोची झाली होती. मिळेल त्या ठिकाणाहून बकऱ्यांची खरेदी करण्यात येत होती.
मात्र मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने व्यापाऱ्यांना मटण दरवाढ करावी लागली होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी प्रति किलो मटणाचा दर 660 रुपयांवरून 680 रुपये इतका झाला आहे. आता बकरी बाजारावरील बंदी उठवण्यात आल्यामुळे मटणाचा दर कमी होणार का? याकडे खवय्यांचे लक्ष लागून राहिले आहे.