नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून न करता पर्यायी पडीक जमिनीतून करावा अशी मागणी सातत्याने केली जात असताना तसेच नुकत्याच झालेल्या चाबूक मोर्चाद्वारे या रेल्वे मार्गाला विरोध दर्शवण्यात आला आहे मात्र तरीही रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासंदर्भात नंदीहळ्ळी ग्रामस्थांना सरकारच्या विशेष भूसंपादन कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून न करता पर्यायी मार्ग आतून करावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी करणारे निवेदन ही देण्यात आले होते या मोर्चा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर बेळगावच्या नियोजित रिंग रोडसह बेळगाव धारवाड रेल्वे मार्ग हलगा मच्छे बायपास रस्ता वगैरे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या प्रकल्पासंदर्भात चाबूक मोर्चा काढून सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवण्याबरोबरच हे प्रकल्प रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती तथापि शेतकऱ्यांची मागणी डावलून बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग संदर्भात आता पुन्हा दुसऱ्यांदा संबंधित गावांना नोटीसा धाडण्यात आले आहेत.
त्यापैकी पहिली नोटीस नंदीहळ्ळी गावकऱ्यांना मिळाली असून त्यांना येत्या शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालयामध्ये बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याचा असंतोष पसरला असून सरकार शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा विचार करणार की नाही? असा संतप्त सवाल केला जात आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी बेळगाव ते धारवाड पर्यंतचे अंतर कमी करण्यासाठी कित्तूर मार्ग रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यावेळी शेतकऱ्यांनी सुपीक जमिनीतून जाणाऱ्या या मार्गाला तीव्र विरोध दर्शवला होता तसेच स्वखर्चाने सर्वेक्षण करून पर्यायी मार्ग दाखविला होता. तरीही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गेल्या कांही महिन्यांपासून भूसंपादनासाठी नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्याला विरोध करत अलीकडेच शेतकऱ्यांनी धारवाड येथे जाऊन मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले आहेत. त्यानंतर चाबूक मोर्चाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मात्र तरीही आता पुन्हा नोटीसा धाडण्यात येत असल्यामुळे कर्नाटकातील भाजप सरकारने बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच रचला असल्याचा आरोप केला जात आहे. देसूर, के. के. कोप्प भागातील शेत जमीन सुपीक असून या भागात ऊस व इतर पिके घेतली जातात. मात्र नियोजित रेल्वे मार्गामुळे या गावांसह गर्लगुंजी, राजहंसगड, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, नेगिनहाळ येथील शेतीचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या भागातून रेल्वे मार्ग न करता पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.