टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिज म्हणजे अभियांत्रिकीचे इतके उत्कृष्ट उदाहरण आहे की हा तयार झाल्यापासून तक्रारी सुरू झाल्या आहेत. आता पथदिपांअभावी रात्रीच्या वेळी हा ब्रिज वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिजची उभारणी करण्यात आली असली तरी उद्घाटन झाल्याच्या काही दिवसांपासूनच सोयीचा ठरण्याऐवजी हा ब्रिज वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. उद्घाटनानंतर तीन-चार दिवसातच या ब्रिजवरील रस्त्याला भगदाड पडले. त्याचप्रमाणे ब्रिजवरील रस्त्याचे एका बाजूला पायथ्याच्या ठिकाणी डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरणच करण्यात आले नव्हते.
त्यामुळे ब्रिजवरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना संबंधित ठिकाणी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. अलीकडेच या ब्रिजवर तिहेरी अपघात होऊन तिघे जण जखमी झाले होते आणि त्यापैकी एकाची अवस्था गंभीर होती.
आता सध्याच्या घडीला या ओव्हर ब्रिजवरील सर्व पथदीप बंदावस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ब्रिजवरील मार्ग अंधारात बुडून जात आहे. परिणामी ब्रिजवर प्रवेश करताना वाहन चालकांना काळजीपूर्वक आपल्या वाहनांचे हेडलाईट सुरू ठेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. सदर ब्रिजच्या ठिकाणचे रात्रीच्या वेळी असलेले अंधकारमय वातावरण लक्षात घेता भरधाव वेगात असलेल्या एखाद्या वाहनाचा अथवा नवख्या वाहन चालकाचा या ठिकाणी गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर्नाटक सरकारचे बेळगावातील हिवाळी अधिवेशन जवळ आले आहे. त्यामुळे कदाचित हा ओव्हर ब्रिज लवकर प्रकाशित होईलही मात्र तत्पूर्वी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार? असा संतप्त सवाल या मार्गावरून नेहमी ये -जा करणाऱ्या वाहन चालकांकडून केला जात आहे.