बेळगावच्या नव्या मास्टर प्लॅनच्या कामाचे कंत्राट देण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्याचे वेळ बेळगाव शहर विकास प्राधिकरणावर (बुडा) आली आहे. परिणामी कंत्राटदार निश्चिती व प्रत्यक्ष मास्टर प्लॅनचे काम सुरू होण्यास पुन्हा विलंब होणार आहे.
बेळगाव शहर व बुडा कार्यक्षेत्रात सध्या असलेल्या 27 गावांसाठीचा नवा मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. सध्याच्या मास्टर प्लॅनचा कार्यकाळ 31 मार्च 2021 रोजीच संपला असून गेल्या 1 एप्रिल 2022 पासून नवा मास्टर प्लॅन अंमलात येणे आवश्यक होते.
मात्र तसे झालेले नाही. बुडाने 2019 मध्ये नवा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी निविदा काढली होती. तथापी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून प्रमुख शहरांचा मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्य शासनानेच निविदा प्रक्रिया राबवून सप्टेंबर 2020 मध्ये ती पूर्ण केली. त्यावेळी बेळगाव, हुबळी -धारवाड व गदग या तीन शहरांच्या मास्टर प्लॅनच्या कामाचे कंत्राट ई -जीआयएस कंपनीला मिळाले.
सदर कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2021 ची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र कंपनीला ही डेडलाईन पाळता आली नाही. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला मुदतवाढ देण्यात आली.
कंपनीने मास्टर प्लॅनशी संबंधित बेस मॅपचे कामही पूर्ण केले होते. कंपनीने त्यानंतर झालेल्या कामाचे बिल देण्याची केलेली मागणी शासनाने अमान्य केली. परिणामी मार्च 2022 मध्ये कंपनीने मास्टर प्लॅन करण्याचे काम थांबविले.
कंपनीने काम पुन्हा सुरू करावे यासाठी प्रयत्न झाले तथापि त्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे शासनाने ई -जीआयएस कंपनीचे कंत्राट रद्द करून मास्टर प्लॅनची जबाबदारी बुडाकडे दिली आहे. मात्र बुडाने दोन वेळा प्रयत्न करूनही मास्टर प्लॅन कामासाठी दुर्दैवाने कंत्राटदार मिळालेला नाही.