चीन, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘चांचणी, शोध, उपचार आणि लसीकरण’ हे पंचतंत्र वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूची जारी केली आहे. या खेरीज मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी राज्यात उद्भवणाऱ्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्या अनुषंगाने चांचणी आणि लसीकरण अनुपालनाचा नवा कोरोना शिष्टाचार जारी केला आहे.
नव्या कोरोना शिष्टाचारानुसार सद्य परिस्थिती लक्षात घेऊन कोरोना चांचण्या वाढवाव्यात आणि आढळून येणाऱ्या सर्व आयएलए /सारी रुग्णांची कोरोना चांचणी करणे हॉस्पिटल्ससाठी सक्तीची असणार आहे.
आजाराची लक्षणे आढळणाऱ्या खास करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांची चांचणी झाली आहे याची खातरजमा केली जावी. आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची चांचणी नजरचुकीने राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि बीबीएमपी यांनी पुरेशी चांचणी पथके उपलब्ध करावीत.
बेंगलोर बीआयएएल विमानतळ आणि मंगळूर विमानतळाच्या ठिकाणी सुरू असलेली प्रवाशांची 2 टक्के यादृच्छिक चांचणी कायम सुरू ठेवावी आणि या संदर्भातील जीओआयच्या पुढील मार्गदर्शक सूचीचे पालन करावे. सर्व कोरोना बाधित रुग्णांचे नमुने संपूर्ण जीनोमी सिक्वेन्सिंगसाठी सक्तीने प्रयोगशाळेकडे धाडले जावेत. सर्व थरावर लसीकरण शिबिरांचे आयोजन करून डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत पुरवठ्यानुसार बूस्टर डोस लसीकरणाचा वेग वाढवून त्याचे प्रमाण सध्याच्या 20 टक्क्याहून 50 टक्क्यापर्यंत केले जावे.
सार्वजनिक (सरकारी) आणि खाजगी हॉस्पिटल्सची तयारी – जिल्हा हॉस्पिटल्स आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये खास कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी किमान बेड्स उपलब्ध असले पाहिजेत. कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा सुविधा सज्ज असल्या पाहिजेत. जिल्हा आणि तालुकास्तरावरील हॉस्पिटल्स चिकित्सा तयारी ऑक्सिजन पुरवठा, औषध आणि मनुष्यबळ याबाबतीत मूल्यांकनासह सज्ज ठेवले जावे. ऑक्सीजन पर्याप्त आहे याची खातरजमा करण्यासाठी सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय हॉस्पिटल्सनी आपल्याकडील ऑक्सिजन पायाभूत सुविधांची किमान 15 दिवसातून एकदा कोरडी चांचणी घेतली जावी. आरोग्य सेवा सुविधांच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्ण त्यांचे मदतनीस आणि रुग्णांना भेटण्यास येणाऱ्यांनी फेस मास्क वापरणे सक्तीचे असेल.
सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना तात्काळ कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्याची सूचना केली जावी. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर मिळवलेल्या नियंत्रणाच्या बाबतीत आत्तापर्यंत प्राप्त केलेले यश अबाधित ठेवण्यासाठी उपरोक्त मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन अंमलबजावणी होईल यावर राज्य जिल्हा आरोग्य प्रशासन आणि बीबीएमपी आरोग्य प्रशासनानाला जातीने लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.