केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ग्वाही दिल्यामुळे खानापूर तालुक्यातील म्हादाई योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती राज्याचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे.
राज्याचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन कर्नाटकातील विविध पाटबंधारे योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी म्हादाई योजनेला तातडीने मंजुरी देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
म्हादाई योजनेतील कळसा -भांडुरा नाल्याचे काम न्यायालयाच्या स्थगितीमुळे सध्या बंद आहे. तथापि या योजनेचा सुधारित आराखडा पाटबंधारे खात्याने तयार केला आहे तो आराखडा अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यानंतर कळसा भांडुरा नाल्याचे काम सुरू करता येणार आहे.
म्हादाई योजनेतून कळसा व भांडुरा या दोन नाल्यांचे पाणी वळवून मलाप्रभा नदीत सोडले जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम कालवे तयार केले जात आहेत. गोवा सरकारने त्याला आक्षेप घेऊन जल लवादाकडे तक्रार केल्यामुळे कामाला स्थगिती मिळाली.
त्यानंतर कर्नाटक सरकारने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे. आता केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या ग्वाहीमुळे महागाई योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे पाटबंधारे मंत्री कारजोळ यांनी सांगितले आहे.