बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी ‘चलो कोल्हापूर’चा नारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली असून या आंदोलनाला कोल्हापूरसह परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे.
१९ डिसेंबर रोजी बेळगावमधील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित केलेला महामेळावा पोलिसी दडपशाहीने रोखण्यात आला होता. याचप्रमाणे समिती नेत्यांना अटक देखील करण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज उठवला असून ‘चलो कोल्हापूर’चा नारा देण्यात आला आहे.
समितीने कोल्हापुरात धरणे आंदोलन करून कर्नाटकी अत्याचारा विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात समिती पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोल्हापूर मधील विविध पक्षांच्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर आंदोलनाची माहिती दिली आहे.
सीमाप्रश्नी कोल्हापूर मधील सर्व पक्ष आणि संघटनांनी मराठी भाषिकांना नेहमीच पाठबळ दिले आहे. त्या दृष्टिकोनातून सोमवारच्या धरणे आंदोलनासाठी देखील कोल्हापूर वासियांचा पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी ग्वाही कोल्हापुरातील विविध पक्ष आणि संघटनांनी दिली आहे.
या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या आंदोलनासाठी समितीने विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन केले आहे. अलीकडे कर्नाटक सरकारचे सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार वाढले असून कोणत्याही अत्याचाराला किंवा दबावाला न घाबरता मराठी भाषिक पुन्हा एकदा लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोल्हापूरमधील धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सीमाभागातील प्रत्येक गावातून करण्यात आला असून कोल्हापूरवासीयांनी देखील समितीला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे.