बेळगाव : बेळगावमधील सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या महामेळाव्याला यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून रोख लावला. यावेळी झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. यासंदर्भात आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये कर्नाटक प्रशासनाने १९ डिसेंबर रोजी आयोजिण्यात आलेला महामेळावा ज्यापद्धतीने दडपशाही करून बंद पाडला, आणि त्यानंतर ज्यापद्धतीने समिती नेत्यांना अटक करण्यात आली, मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात आला, या गोष्टीचा निषेध नोंदविण्यात आला. यावर विचारविनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यात आली.
कर्नाटकात यापुढे आंदोलन करण्यात आले तर कर्नाटक प्रशासन अशाचपद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय करेल, अशाचपद्धतीने आंदोलने दडपली जातील, युवकांवर खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील यामुळे हि बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी, केवळ सीमावासीयांना पाठिंबा देणारे ठराव मंजूर न करता कृतिशील पाऊले उचलावीत, सर्वपक्षीय बैठक बोलावून महाराष्ट्र बंदची हाक देऊन सीमावासीयांना पाठिंबा दर्शवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्याची विनंती करण्यात येणार आहे, कर्नाटक सरकार कशापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे, कर्नाटक सरकार लोकशाहीची कशापद्धतीने पायमल्ली करून दडपशाहीचे अस्त्र उगारत आहे, याची इत्यंभूत माहिती दिल्लीदरबारी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती समिती नेते आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीत दिली.
सोमवारी शिवाजी उद्यान येथे जमून छत्रपती शिवरायांच्या पूजनानंतर कोल्हापूरमधील धरणे आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी सामील व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी आदींसह समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



