जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या म. ए. समिती नेत्यांवर दडपशाही करून अटक करण्यात आली होती. पण, संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
समिती नेत्यांना अटक करण्यात आल्यामुळे गावागावांतून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील वातावरणही तापले. त्याची दखल घेत अखेर पोलिसांनी म. ए. समिती नेत्यांना अटक न दाखवता ताब्यात घेऊन सुटका केली. समिती नेत्यांनी जमावबंदी (कलम 144) आदेश धुडकावल्याचा आरोप करत पोलिसांनी ही कारवाई केली होती. प्रत्यक्षात मराठी माणसांवर दबाव आणण्यासाठी नेत्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, लोकांच्या वाढत्या संतापाची दखल घेत अखेर समिती नेत्यांना सोडण्यात आले.
लोकशाहीच्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र एकीकरण समितीने आजचे हे आंदोलन आयोजित केले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देऊन ते निवेदन पंतप्रधानांपर्यंत पाठवण्याची विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार होती. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला यावेळी काही ठराविक लोक जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येतो अशी मागणी समितीने नेत्यांनी केली मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. कलम 144 असताना अशाप्रकारे आंदोलन करणे चुकीचे आहे. असे सांगून सर्व समिती नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
यानंतर प्रतिबंधात्मक गुन्ह्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या असून समिती नेत्यांना राजकीय अटक आणि सुटका अशा प्रकारचे गुन्हे घालण्याचे प्रकार कर्नाटक पोलिसांकडून घडले आहेत.
एकंदर परिस्थितीत सकाळी झालेली कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांची अटक आणि सायंकाळी झालेली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांची अटक याची चर्चा दिवसभर बेळगाव शहर परिसरात सुरू होती.