कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून वेळोवेळी होणारी अवमानकारक वक्तव्य याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर महाविकास आघाडीने सीमावासीय मराठी बांधवांसमवेत धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमाबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.
कोल्हापूर (महाराष्ट्र) शहरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात सध्या कर्नाटक सरकारकडून जी अरेरावीची भूमिका घेतली जात आहे, त्याचा या आंदोलनाप्रसंगी जोरदार निषेध करण्यात आला. सदर धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कोल्हापूर येथील नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शिवसेना नेते अरुण दुधवाडकर, बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आदींसह महाराष्ट्र व सीमा भागातील नेते उपस्थित होते.
आंदोलन स्थळी बोलताना समितीने नेते मनोहर किणेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली गेली 66 वर्षे सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत असे सांगितले. लोकशाही मार्गाने लढा देऊन ही त्याला यश येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यापेक्षा दुर्दैव म्हणजे आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो आणि या लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या देशातच लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या लढ्याची कदर केली जात नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक भाषिकाला त्यांच्या त्यांच्या राज्यात घालण्यात आले. मात्र आम्ही मराठी भाषिक असताना तत्कालीन केंद्र सरकारच्या धुरीनांनी आम्हाला अन्यायाने कर्नाटकात डांबले आणि तेंव्हापासून आमच्यावर अन्याय अत्याचार सुरू आहेत. हा अन्याय दूर व्हावा यासाठी सीमा भागातील मराठी भाषेत गेली 66 वर्षे सातत्याने लढा देत आहेत.
प्रारंभीच्या काळात आम्ही नगरपालिकेसह ग्रामपंचायत निवडणुका जिंकून महाराष्ट्रात सामील होण्याचे ठराव केले आहेत. यासह लोकशाही मार्गाने वेगवेगळी आंदोलन केली आहेत. मात्र दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. महाराष्ट्राने आमच्या पाठीशी असल्याचे सातत्याने सांगितले असले तरी सीमाप्रश्नाची सोडवणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र खरोखर आपल्या पाठीशी आहे ही गोष्ट सीमावासीय मराठी बांधवांना पटणार नाही अशी त्यांच्या भावनात भावना निर्माण झाली आहे. मात्र आता त्यासाठी महाराष्ट्राच्या विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने वेगवेगळी पावले उचलून या प्रश्नाला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे आज महाविकास आघाडीचे लोक आमच्या पाठीशी आहेत हे लोकसभेतही दिसते आणि इथे प्रत्यक्षातही दिसून येत आहे. सीमावाद सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई जत, अक्कलकोट ही गाव आमची आहेत असा दावा करत नवा वाद निर्माण करत आहेत. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतमध्ये तसा ठराव झाला असल्याचेही ते सांगतात. तसे जर असेल तर गेली 66 वर्षे नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सातत्याने ठराव केले आहेत त्या ठरावाची दखल न घेता जत, अक्कलकोट येथील ठरावाची दखल घ्यावी असे वाटत असल्यास ते सहन केले जाणार नाही असे माजी आमदार मनोहर किनेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी कोल्हापूरच्या स्थानिक नेतेमंडळींनी ही आपले विचार व्यक्त करताना कर्नाटक सरकारवर कडाडून टीका केली.
आंदोलनात कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या आजच्या या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जमाबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.