बेळगाव लाईव्ह : गेली ६७ वर्षे सीमालढा शब्दांच्या माध्यमातून जागृत ठेवणाऱ्या सीमाभागातील मराठी पत्रकारांना ‘अक्षर सीमासत्याग्रही’ म्हणून संबोधण्यात यावे, असा ठराव आज पत्रकार संघाच्या बैठकीत मांडण्यात आला.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या समस्यांविषयी निवेदन देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेली ६७ वर्षे सीमालढ्यात मराठी भाषिकांच्या बाजूने उभा राहणारा मराठी पत्रकार सोयी-सुविधांच्या उपेक्षित राहिला आहे.
आज सीमाभागातील मराठी पत्रकार अनेक प्रकारच्या समस्यांच्या गर्तेत आहे. आरोग्य, शिक्षण, पेन्शन यासारख्या अनेक समस्या पत्रकारांसमोर उभ्या आहेत. जोवर पत्रकाराची लेखणी झिजत आहे तोवर पत्रकार लोकांच्या नजरेत राहतो. मात्र एकदा लेखणी थांबली कि पत्रकारांवर हालाखीची परिस्थिती येते. निवृत्तीनंतर पेन्शनचीही सोय नसल्याने निवृत्तीनंतरचे पत्रकारांचे आयुष्य अत्यंत कठीण होते.
या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार करून महाराष्ट्र शासनाकडे चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी, तसेच सीमाभागातील मराठी पत्रकारांना सोयी-सवलती मिळवून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, घरकुलासंदभातील समस्या, पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त ओळखपत्र, महाराष्ट्रातील पत्रकारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा सीमाभागातील पत्रकारांना पुरविण्यात याव्यात, याप्रमाणे इतर अनेक मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
ज्याप्रमाणे सीमासत्याग्रही, सीमातपस्वी अशापद्धतीने सिमाचळवळीतील सहभागी असलेल्यांना संबोधले जाते, त्याचप्रमाणे मराठीचा आणि सीमालढ्याचा चालता फिरता इतिहास मांडणाऱ्या मराठी पत्रकारांना ‘अक्षर सीमासत्याग्रही’ असे संबोधले जावे, असा ठरावही या बैठकीत मांडण्यात आला.
या बैठकीला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक, सचिव शेखर पाटील, साहित्यिक गुणवंत पाटील, कृष्णा शहापूरकर, सुहास हुद्दार, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी, प्रसाद प्रभू, डी. के. पाटील, परशराम पालकर,महादेव पवार,संजय चौगुले आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.