सीमाभागात दरवर्षी १२ विविध ठिकाणी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून साहित्याचा जागर केला जातो. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यात येते. साधारण नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार हा साहित्यसोहळा फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरगच्च कार्यक्रमांनी आयोजिला जातो. सुमारे ३८ वर्षांपासून सीमाभागात ही साहित्य संमेलनाने आयोजित केली जातात.
कोविड नंतर पुन्हा भरगच्च असा साहित्य सोहळा रंगविण्यासाठी संमेलन संयोजक सज्ज झाले असून यंदाचे पहिले साहित्य संमेलन कारदगा येथे पार पडले आहे. यानंतर एकामागोमाग एक साहित्य संमेलन आयोजकांनी संमेलनांच्या तारखा जाहीर केल्या असून आतापर्यंत ७ साहित्य संमेलनांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
११ डिसेंबर रोजी बेळगुंदी ग्रामीण साहित्य संमेलन , १७ डिसेंबर रोजी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, १ जानेवारी २०२३ रोजी माचीगड साहित्य संमेलन, ८ जानेवारी रोजी कडोली साहित्य संमेलन, १५ जानेवारी रोजी कुद्रेमानी साहित्य संमेलन, २२ जानेवारी रोजी उचगाव साहित्य संमेलन, २८ व २९ जानेवारी रोजी प्रगतिशील लेखक संघाचे साहित्य संमेलन अशा ७ साहित्य संमेलनांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त सांबरा, येळ्ळूर, निलजी, मंथन अशा साहित्य संमेलनांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत.
या सर्व साहित्य संमेलनांमध्ये निलजी आणि वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी संमेलन हे खास विद्यार्थ्यांसाठी आयोजिण्यात येते. तर मंथन साहित्य संमेलन हे महिलांसाठी आयोजित केले जाते. कडोली येथे सर्वप्रथम साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.
यानंतर सीमाभागात बऱ्याच तालुक्यांमध्ये साहित्याचा जागर हळूहळू सुरु झाला. ग्रंथदिंडी, संपूर्ण गावात उत्सवाचे स्वरूप, वनभोजन, बाहेरून येणारी साहित्य संपदा, परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार अशा स्वरूपाची साहित्य संमेलने कोविडनंतर पुन्हा बेळगावकरांना अनुभवता येणार आहेत.