मराठा समाजाला इतर मागासवर्ग 3 -बी ऐवजी 2 -ए आरक्षण मिळावे, या आपल्या प्रमुख मागणीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषद आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे संयुक्तरीत्या आज मंगळवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे मोर्चा काढून धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
मराठा समाजाला 2010 च्या शंकराप्पा आयोगाच्या शिफारशीनुसार वाल्मिकी समाजाला दिलेल्या आरक्षणाप्रमाणे आरक्षण द्यावे अथवा संविधानानुसार ते शक्य नसेल तर किमान 2 -ए मध्ये आरक्षण द्यावे. या मागणीच्या पूर्ततेसाठी तसेच मराठा समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात जोरदार मांडला जावा,
यासाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशन व सकल मराठा समाज यांनी आज मंगळवारी बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या ठिकाणी मोर्चा काढून धरणे सत्याग्रहाला सुरुवात केली आहे.
मराठा समाजाचे स्वामीजी श्री मंजुनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड, बेळगावातील मराठा समाजाचे नेते व भाजप ओबीसी राज्य मोर्चा सचिव किरण जाधव, क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष वैभव कदम, उपाध्यक्ष महेश रेडेकर आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
सदर आंदोलनात विनायक कदम, धनंजय जाधव, विठ्ठल वाघमोडे, गणपत पाटील, संजय पाटील, बंडू कुद्रेमनीकर आदींसह बहुसंख्य मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. यामधील आंदोलनकर्त्या मराठा महिलांचा लक्षणीय सहभाग साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.