बेळगाव : रविवार दि. २५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नाताळ म्हणजेच ख्रिसमच्या निमित्ताने शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांच्या या सणासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठ फुलली असून ख्रिसमस ट्री, आकर्षक भेटवस्तू, सांताक्लॉजचे मुखवटे, कॅप्स, बेल्स, ग्रीटिंग्स कार्ड, कँडल्स अशा विविध सजावटीच्या वैविध्यपूर्ण वस्तूंनी बाजारपेठेला झळाळी आली आहे.
ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले असून बेळगावमधील अनेक बेकरींमध्ये केक, पेस्ट्रीचेही विविध फ्लेवर्स दाखल झाले आहेत.
शहरातील बिशप चर्चसह फातिमा कॅथेड्रल, सेंट मेरी, बेलगाम चर्च, सेंट अँटनी अशा विविध चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सायंकाळपासूनच चर्चमध्ये विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावची बाजारपेठ परगावातील नागरिकांना नेहमीच आकर्षित करते. यानिमित्ताने गोव्याहून आज अनेक नागरिक खरेदीसाठी दाखल झाले आहेत.
मात्र अधिवेशनामुळे अधिवेशनाच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांकडून नागरिकांना वेठीला धरण्यात येत आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आल्याने बेळगावच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. हा सण केवळ ख्रिस्ती बांधवच नाही तर अन्य धर्मीय बांधव देखील साजरा करतात.
शहरातील चर्चमधील आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक चर्चला भेट देतात. तसेच अनेक बेकरीमधून केकचे प्रदर्शन देखील भरविण्यात येते. विकेंड आणि ख्रिसमसचा उत्साह शनिवारपासूनच बेळगावमध्ये पाहायला मिळत आहे.