राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याचा आणि पर्यायाने संपूर्ण उत्तर कर्नाटकाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.रामदुर्ग येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, कर्नाटक विद्युत पारेषण महामंडळ, क्र. शालेय शिक्षण साक्षरता विभाग आणि मागासवर्गीय कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी येथे अंदाजे रु. ६७१.२८ कोटी रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
बेळगाव हा राज्याचा मुकुटमणी आहे. या जिल्ह्यातील सिंचन, उद्योग आणि शेतीच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, तसेच उत्तर कर्नाटकाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी सरकार येत्या काही दिवसांत विशेष योजना जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रामदुर्ग तालुक्यातील काही गावांना वारंवार पुराचा फटका बसू नये यासाठी शासनाने मलप्रभा नदीच्या काठावर गतिरोधक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामदुर्ग येथील बसवेश्वर सर्कल येथे जगज्योती बसवेश्वरांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.
यावेळी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ बोलताना म्हणाले, मलप्रभा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांच्या संरक्षणासाठी १२६ कोटी रुपये खर्चून गतिरोधक बांधण्यासह विविध कामे, तसेच रामदुर्ग तालुक्यातील 19 तलाव भरण्याच्या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांना या महिन्यात डीपीआर तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, येत्या अर्थसंकल्पात तलाव भरण्याच्या प्रकल्पासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात वाढ करून मुख्यमंत्र्यांनी अनेक दशकांची मागणी पूर्ण केली आहे, याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांबाबत काही निर्णय घेतल्याने आता कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांच्या विकासासंदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली असून सीमेपलीकडे असणाऱ्या कन्नड शाळांच्या विकासासाठी कन्नड विकास प्राधिकरणामार्फत १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच गोवा राज्यात कन्नड भवन बांधण्यासाठी दहा कोटी रुपये, सोलापूर, कासारगोड याठिकाणीही कन्नड भवन बांधण्यासाठी प्रत्येकी १० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. कन्नड भाषिकांचा विकास आणि संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, कन्नडिग जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असोत किंवा देशाच्या कोणत्याही राज्यात असो त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या राज्याच्या राष्ट्राचा आणि भाषेचा विकास करण्याचा सरकारचा संकल्प आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी, नवे कर्नाटक निर्माण करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये १८०० ग्रामपंचायती विकसित करण्याची योजना राबविण्यात येत असून रस्त्यांच्या सुधारणेसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सी. सी. पाटील, उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, नगरविकास मंत्री भैरती बसवराज, केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी. राजीव, हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी,वि. प. सदस्य लक्ष्मण सवदी, हनुमंत निराणी, आमदार अनिल बेनके, डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.