अलीकडेच बेळगावचे भाजप राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगावहून मुंबई आणि हैदराबाद शहरासाठी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी अशी विनंती राज्यसभेत केली आहे. याखेरीज भारतीय लष्करात कर्नाटक रेजिमेंट निर्मिती -स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बेळगावहून मुंबई आणि हैदराबादला रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात राज्यसभेत बोलताना भाजपचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले की बेळगाव शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. शैक्षणिक पर्यटन व्यापार उद्योग आदी कारणांसाठी बेळगावहून दररोज हजारो प्रवासी मुंबई आणि हैदराबादला प्रवास करतात.
मात्र प्रवासात बराच वेळ खर्ची जातो. मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी सध्या बस सेवा व राज्य मार्ग उपलब्ध असला तरी मार्गावरील मोठ्या वाहतुकीमुळे वेळेचा अपव्यय होतो. सध्या बेळगाव येथून हैदराबादसाठी कोणतीही थेट रेल्वे सेवा नाही. त्याचप्रमाणे बस सेवेसाठी प्रवाशांना दुप्पट, तिप्पट भाडे मोजावे लागत आहे.
गेल्या बऱ्याच वर्षापासून मुंबई व हैदराबाद शहरासाठी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी अशी जनतेची मागणी आहे. ही सेवा सुरू झाल्यास माझ्या मतदारसंघातील लोकांच्या प्रवासाची चांगली सुलभ सोय होणार आहे. तरी सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने याकडे तात्काळ लक्ष देऊन बेळगावला मुंबई आणि हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी अशी विनंती करून त्यामुळे पर्यावरण प्रदूषण ही कमी होईल आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेल्वेला चांगला महसूलही मिळेल, असे कडाडी यांनी स्पष्ट केले.
लष्करातील कर्नाटक रेजिमेंट स्थापनेबद्दल बोलताना कडाडी यांनी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, राणी अबक्का, किलाडी राणी चन्नम्मा आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेल्या चित्रदुर्गच्या लोह महिला ओनक्की ओबव्वा यांची उदाहरणे देऊन कर्नाटकच्या शौर्य आणि साहसावर प्रकाश टाकला. बेलवडी मल्लम्मा यांनी देखील 2000 हून अधिक महिला योद्ध्यांच्या फौजेचे नेतृत्व केले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचे पहिले फिल्ड मार्शल जनरल के. एम. करिअप्पा आणि तिसरे लष्कर प्रमुख के. एस. थीमय्या यांनी भारतीय सेनेत निष्ठेने आदर्शवत सेवा बजावली. हे सर्व लक्षात घेता भारतीय लष्करात कर्नाटक रेजिमेंटच्या नावाने नव्या रेजिमेंटची निर्मिती करणे संयुक्तिक ठरणार असल्याचे इराण्णा कडाडी यांनी सांगितले.