Wednesday, January 15, 2025

/

अधिवेशन काळात तयार होतोय तब्बल 300 टन कचरा!

 belgaum

कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात बेळगाव शहर व सुवर्णसौध परिसरात मिळून तब्बल 300 टन कचरा तयार होत असून इतर सर्व सामान्य काळात जमा होणाऱ्या कचऱ्यापेक्षा हा कचरा सुमारे 40 टन अतिरिक्त आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम तर वाढलेच आहे, शिवाय महापालिकेला कचरा प्रक्रिया खर्चाचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

सध्या बेळगाव शहर व सुवर्णसौध परिसरात मिळून तब्बल 300 टन कचरा तयार होत असून त्या कचऱ्याची उचल व वाहतूक बेळगाव महापालिकेकडून केली जात आहे. बेळगावात अधिवेशन नसलेल्या काळात शहर व परिसरात मिळून रोज 260 ते 270 टन कचरा तयार होतो. या कचऱ्याची उचल करून तो तुरमुरी कचरा डेपोकडे नेला जातो.

बेळगावात सोमवार ते शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात कचरा वाढतो, शनिवारी व रविवारी कचरा वाढत नाही, असे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आता अधिवेशन काळात महापालिकेचा संपूर्ण आरोग्य विभाग शहर स्वच्छतेच्या कामात व्यस्त आहे. बेळगाव शहरातील कचऱ्याचे प्रमाण वर्षागणिक वाढतच आहे.

दहा वर्षांपूर्वी शहरात दररोज 200 टन कचरा जमा होत होता. आता गेल्या दहा वर्षात त्यात 60 ते 70 टनाची भर पडली आहे. दररोज पहाटेपासून कचरा संकलनाची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर कचऱ्याची उचल करून तो तुरमुरे येथील प्रकल्पात पाठवला जातो. रामकी एन्विरो कंपनीकडून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे कंपोस्ट खत निर्माण केले जाते. मात्र या प्रक्रियेसाठी महापालिकेला प्रति टनामागे शुल्क द्यावे लागते. परिणामी कचरा वाढला की त्यावरील प्रक्रियेचा खर्चही वाढतो. बेळगाव महापालिकेकडून कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी केला जाणारा खर्च हा राज्यात सर्वाधिक आहे.

अधिवेशन काळात बेळगाव शहरातील कचरा आणि सुवर्णसौध परिसरातील कचऱ्याची उचल करण्याबरोबरच पोलिसांसाठी केलेले निवास व्यवस्था, शहरात ज्या ज्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आहे तेथील कचरा तसेच आंदोलन स्थळावरील कचरा महापालिकेकडूनच उचलला जातो. एकंदर दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन काळात कचरा उचल व त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.