बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या सोमवारी 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी बेळगाव शहर परिसरात दहा दिवस 4,931 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
बेळगाव शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरळीत यशस्वीरित्या पार पडावे यासाठी 6 जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौज कार्यरत राहणार आहे.
त्यामध्ये 11 अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, 43 उपजिल्हा पोलिस प्रमुख, 95 पोलीस निरीक्षक, 241 पोलीस उपनिरीक्षक, 298 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2829 हेड कॉन्स्टेबल व पोलीस, 800 कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे (केएसआरपी) जवान, 170 सीएआर, 35 गरुडा पथकं, 130 एएससी, 100 वायरलेस कर्मचारी आणि तितकेच होमगार्डस् आदींचा समावेश असणार आहे.
परगाहून आलेले पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या निवासाची व्यवस्था टाऊनशिप, मुक्तीमठ, पीटीएस कंग्राळी, मच्छे, एटीएस सांबरा, वीरभद्रेश्वर मंदिर, डीएआर पीटीएस बेळगाव, बंटर भवन, बाबू जगजीवनराम हाॅल, रयत भवन, गुजरात भवन, चिंडक हॉल, मारुती मंदिर शहापूर, पंत महाराज कल्याण मंडप आणि पोलीस गेस्ट हाऊस या ठिकाणी करण्यात आली आहे.
अधिवेशन कालावधीत 60 केएसआरटीसी बस गाड्यांचा ताफा कार्यरत राहण्याबरोबरच पोलीस फौजफाट्या व्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाचे 12 पाण्याचे बंब, 16 रुग्णवाहिका, एक गरुडा वाहन सज्ज ठेवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे गेल्या 12 डिसेंबरपासून येत्या 11 जानेवारी 2023 पर्यंत सुवर्ण विधानसौधच्या 1 कि. मी. अंतराच्या परिघात निषेधाज्ञा जारी करण्यात आली आहे.