बेळगाव सीमा भागातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वाद तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज शुक्रवारी लोकसभेमध्ये जोरदार आवाज उठविला. तसेच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून समन्वयातून सीमा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.
नवी दिल्ली येथे संसदेत अर्थात लोकसभेमध्ये सभापती राजेंद्र अगरवाल यांच्या संमतीने शून्य तासामध्ये हातकणंगले महाराष्ट्राचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव सीमा भागातील सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले की अत्यंत गंभीर आणि महत्वपूर्ण विषयाकडे मी सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो देश हा सर्व नागरिक व प्रांतांमुळे आणि बंधुभावातून मार्गक्रमण करत असतो. देशातील प्रत्येक नागरिक आपला बंधू आहे असे आपण मानतो. मात्र याच भारतीयांमध्ये सीमावादाच्या नावाने प्रत्येक गावागावात वाद होऊन देशाच्या एकतेला धोका निर्माण होतो की काय अशी परिस्थिती सीमाभागात निर्माण झाली आहे. मी स्वतः महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील एका गावाचा नागरिक आहे. आमचा प्रयत्न असा असतो की बंधुभाव जपला जावा. मात्र सध्या सीमाभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील मराठी माणूस पिचला गेला आहे. त्याला न्याय देवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. मात्र त्याबरोबरच तेथील राज्य शासन तेथील मुख्यमंत्री असे वक्तव्य करत आहेत की ज्यामुळे सीमा भागातील मराठी जनता हवालदिल व्हावी अशी परिस्थिती आहे.
सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोर्चे, आंदोलन होत आहेत. पोलीस मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहेत. कन्नड वेदिके ही संघटना मराठी भाषिकांना अन्याय करत आहे आणि हा अन्याय शासन पुरस्कृत आहे की काय? अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे असे सांगून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात मी तज्ञ समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय माझी केंद्र शासनाला विनंती आहे की त्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसून त्यांच्या समन्वय घडवून आणावा. दोन्ही राज्याना चांगले संबंध राहतील याची आश्वासकता देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली.
दरम्यान, सीमाप्रश्नी आज शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसमवेत भेटण्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न होता. मात्र त्याला काहीशी खिळ बसल्याचे दिसून आले. कारण खासदार सुळे यांच्या विनंतीवरून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने व श्रीरंग बारणे खासदारांच्या शिष्टमंडळात सोबत जात असताना ठाकरे गटाच्या शिवसेना खासदारांनी त्याला आक्षेप घेतला.
परिणामी दालनातूनच खासदार माने आणि बारणे माघारी परतले. या प्रकारामुळे दुर्दैवाने महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नाही.