भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगाव यांच्यातर्फे विष्णू गल्ली येथे सुरू असलेल्या सत्संगाला दररोज एक गाईचे वासरू आवर्जून हजेरी लावून श्रीमद् भागवत कथाकथन ऐकत असल्यामुळे हा मोठा कुतुलाचा विषय झाला आहे.
भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगावतर्फे विष्णू गल्ली वडगाव येथील रघुनाथ कंग्राळकर यांच्या घरी गेल्या 20 दिवसांपासून सत्संग सुरू आहे. त्यानिमित्ताने दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री गिरवर दास यांचा श्रीमद् भागवत कथा कथनाचा कार्यक्रम होत असतो.
कंग्राळकर यांच्या गाईने अलीकडेच एका वासराला जन्म दिला आहे. हे वासरू गेल्या काही दिवसांपासून गिरवर दास यांच्या श्रीमद् भागवत कथाकथनाला आवर्जून हजेरी लावत असते. दररोज रात्री प्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होते.
सदर श्रीमद् भागवत कथनाचा कार्यक्रम रघुनाथ कंग्राळकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर सुरू आहे. विशेष म्हणजे ते वासरू दररोज पायऱ्या चढून कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते आणि कथाकथन ऐकल्यानंतर प्रसाद आला की बसलेले हे वासरू कुठून उभे राहते आणि प्रसाद घेऊनच तेथून जाते.
श्री गिरवर दास यांचे कथाकथन एका ठिकाणी शांतपणे बसून एकाग्रचित्ताने ऐकणाऱ्या त्या वासराचा भक्तिभाव सर्वांना अचंबित करणारा ठरत असून हा विष्णू गल्ली परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे. कांही श्रद्धाळुंमध्ये हे वासरू म्हणजे पूर्वजन्मीचा ईश्वराचा एखादा निस्सीमभक्त असावा असे बोलले जात आहे.