घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या बेळगावसह राज्यातील 10 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ आंबेडकरांनी भेट दिलेल्या अन्य पाच स्थळांसह संबंधित 10 स्थळांच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 डिसेंबर 1939 रोजी बेळगावला भेट दिली होती. त्यावेळी बेळगावचे तत्कालीन महापौर भीमराव पोतदार यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले होते.
डॉ. आंबेडकर यांनी भेटी दिलेल्या 10 स्थळांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ या महिन्यात बेळगावमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते होणार आहे.
शहरातील कंग्राळ गल्ली येथे 26 डिसेंबर 1939 रोजी डॉ. आंबेडकर वस्तवाडकर कुटुंबीयांकडे वास्तव्यास होते. सध्या अस्तित्वात असलेल्या त्या घराचे संग्रहालयात रूपांतर केले जावे, अशी विविध संघटनांची मागणी आहे. डॉ. आंबेडकरांच्या तत्कालीन भेटी प्रसंगी बेळगाव नगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभाचा खर्च 51 रुपये इतका आला होता.
त्यावेळी डॉ आंबेडकर यांना कांस्याचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव बार असोसिएशनला देखील संबोधित केले होते.