जगाच्या कांही भागांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आपल्या देशात ओमिक्रॉन सबव्हेरिएंट बीएफ.7 ची प्रकरणे आढळून आल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारने निर्धारित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेला सहकार्याचे आणि लसीचा बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या (टीएसी) आज बोलविलेल्या तातडीच्या बैठकीनंतर ते विधानसभेमध्ये बोलत होते. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तज्ञ आणि अधिकाऱ्यांशी राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात चर्चा करून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. कोरोना हद्दपार झाला म्हणून आम्ही निर्धास्त असताना इतर देशांमध्ये तो वाढला आहे. चीनच्या एका प्रांतातून कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. ही बाब राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही गांभीर्याने घेतली आहे. कारण कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या व्हेरियंट्स पेक्षा अधिक आहे, असे बोम्मई म्हणाले.
विधानसभेत ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत प्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी पूर्वीचे निर्बंध आणि बूस्टर डोस यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. सर्वांनी बूस्टर डोस घेऊन सुरक्षित व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र पहिल्या आणि दुसर्या डोस घेण्यासाठी नागरिकात जे स्वारस्य दिसत होते ते बूस्टर डोसच्या बाबतीत दिसत नाही, हे देशभरात घडले आहे. तथापी आम्ही त्याला बूस्टर डोस ला प्राधान्य देणार असून आता त्वरित प्रतिबंधात्मक कारवाईवर लक्ष केंद्रित केले जाईल असे त्यांनी सांगितले.
बोम्मई पुढे म्हणाले, ”या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्यातील जनतेचे सहकार्य मागतो. या टप्प्यावर सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांना त्यांनी सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. जेणेकरून भविष्यात आपण हॉस्पिटलायझेशन आणि मृतांच्या संख्येवर नियंत्रण ठेवू शकू. अखेरीस कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांदरम्यान जे घडले त्याची पुनरावृत्ती होणार नाही.’चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आणि हॉस्पिटलायझेशन वाढले आहे.
आरोग्य मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी देखील लोकांना लसीकरणाचे बूस्टर किंवा प्रतिबंधात्मक डोस घेण्याचे आवाहन केले. आम्ही लसीकरणाचे पहिले दोन डोस 100 टक्के यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, परंतु बूस्टर किंवा प्रतिबंधात्मक डोसला केवळ 20 टक्के कव्हरेजसह चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आमदारांसाठी येथील विधिमंडळात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. राज्यातील संपूर्ण जनतेचे लसीकरण व्हावे या उद्देशाने आम्ही राज्यभर प्रतिबंधात्मक डोससाठी अशी शिबिरे घेणार आहोत, असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बूस्टर डोस सक्तीचा करावा, असे आवाहन केले. जीवन महत्त्वाचे आहे असे सांगून त्यांनी केंद्र सरकारला चीनकडून भारताकडे येणारी थेट विमान सेवा बंद करण्याचे आवाहन केले. तसेच राज्य सरकारला देखील युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.