चीनसह जगाच्या कांही भागांमध्ये कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून राज्यभरात शीत ज्वरासारखा आजार (आयएलआय) आणि श्वसन मार्ग संबंधी आजार (सारी) असलेल्यांची कोरोना चांचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे एअर कंडीशन रूम आणि अंतर्गत बंदिस्त भागात फेसमास्कची सक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याखेरीज केंद्राकडून सुधारित आदेश येईपर्यंत राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची दोन टक्का यादृच्छिक चांचणी सुरू राहील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
अंतर्गत स्थळ, बंदिस्त जागा आणि एअर कंडिशन रूम अशा ठिकाणी फेस मास्कचा वापर करण्याचा सल्ला आम्ही जारी करणार आहोत. याखेरीस संपूर्ण कर्नाटकात आयलआय आणि सारी रुग्णांची कोरोना चांचणी सक्तीची असणार आहे असे आरोग्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सदर बैठकीस संबंधित मंत्र्यांसह आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कोरोना तांत्रिक सल्लागार समितीचे (टीएसी) सदस्य उपस्थित होते. मंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, आजच्या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशी बेड्स आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थेसह कोरोना वाॅर्ड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोना उद्रेकाच्या काळात ज्याप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालय आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्सचे सहकार्य घेण्यात आले होते, तीच प्रक्रिया आता देखील राबविली जाईल.
चीन सारख्या देशांमध्ये कोरोना संसर्गाचा झालेला उद्रेक लक्षात घेऊन राज्यात तसा कोणता रुग्ण आहे का? हे तपासण्यासाठी राज्य सरकारने आपली तयारी आणि उपाययोजनांचे पुनरावलोकन करण्याचे निश्चित केले आहे. कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याचे प्रमाण 20 टक्क्याहून 60 टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिर भरविण्याचे सरकारने ठरविले आहे. त्या अनुषंगाने बूस्टर डोसच्या अतिरिक्त साठ्यासाठी राज्य केंद्राशी समन्वय साधेल.
कोरोनाच्या नव्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालय सज्ज आहेत का हे तपासण्यासाठी त्यांच्या कवायती घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्या माध्यमातून संबंधित रुग्णालयांची ऑक्सिजन निर्मितीची स्थिती, पुरवठा यंत्रणा आणि ऑक्सिजन सिलेंडर्सची क्रियाशीलता तपासली जाईल. कोरोना बाधित रुग्णांचे सर्व नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत धाडले जातील, असेही आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शेवटी स्पष्ट केले.