कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. तसेच येत्या 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली.
बेंगळूर येथे विधानसौधमध्ये आज शनिवारी माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यावर बोम्मई प्रसार माध्यमांशी बोलत होते. कर्नाटक -महाराष्ट्र या दोन राज्यातील बेळगाव सीमाप्रश्नावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवल्यानंतर आता केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर पुढे बोलताना बोम्मई म्हणाले की, कर्नाटकाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव सीमाप्रश्नी येत्या 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला मला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवण्यात आले आहे. अमित शहा यांच्याशीही माझे बोलणे झाले असून बैठकीस बोलावल्यावर येईन असे सांगितले आहे.
कर्नाटकचा मुद्दा, भूमिका आणि वस्तुस्थिती मी आधीच तपशीलासह शाह यांच्या कानावर घातली आहे. नियोजित बैठकीत कर्नाटकची भूमिका स्पष्ट केली जाईल. सीमाप्रश्नी सरकार घेणार असलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी मी चर्चा केली आहे.
बैठकीचे वेळापत्रक निश्चित होताच त्याची माहिती त्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. एकंदर, अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कर्नाटकाची भूमिका ठामपणे मांडली जाईल असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.