ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य अमृत अभियानाची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत असून त्या अंतर्गत आता रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोज तपासणीचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात उत्तम कामगिरी बजावलेल्या टास्क फोर्सला आता आरोग्य अमृत अभियानाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. कोरोना संसर्ग काळात मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदींचा त्रास असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. रुग्णांसाठी रक्तदाब, मधुमेह, रक्तातील ग्लुकोज, हिमोग्लोबिन, बीएमआय चांचण्या वेळोवेळी करावे लागतात.
ग्रामीण भागात वेळेत या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या टास्क फोर्सकडे या चांचण्यांसाठी आवश्यक असणारे चाचणीचे साहित्य (आरोग्य किट) उपलब्ध करून दिले जाणार आहे. याखेरीज कोरोना कीड ही ग्रामपंचायतीने आपल्याकडे ठेवावे लागणार आहे.
आरोग्य किटमध्ये पल्स ऑक्सिमीटर (2), इन्फ्रारेड थर्मामीटर (2), डिजिटल बीपी उपकरण (1), ग्लुकोमीटर (1), ग्लुकोमीटर पट्टी (100), हिमोग्लोबिनो (1), हिमोग्लोबिनो मीटर पट्टी (25), एमयुएसी (1), डिजिटल वजन माप (1), स्टेडियो (1) बीएमआय चार्ट आणि ॲप्लीकेशन (1) हे साहित्य असणार आहे.
मागील वर्षी बेळगावसह राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक टप्प्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना विस्तारित केली जात आहे.